वर्धा : लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. यावर्षी विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनाही या मोहीम हिरहिरीने भाग घेताना दिसत होते. एकूणच यंदाच्या मतदार जागृतीचे व्यापक स्वरुप बघता मतदानाचा टक्का वाढण्याचे शुभ संकेत मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी सर्वाधिक असल्याचे बघायला मिळते. या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांचा क्रमांक लागतो. या नंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा क्रमांक लागतो. परिणामी एकूण मतदारांच्या सुमारे २० ते ३० टक्के मत घेणारा घेणारा उमेदवार निवडला जातो. वास्तविक, त्या विजयी उमेदवाराला अपेक्षित जनसमर्थन राहात नाही. तरीही तो आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. लोकशाहीत १०० टक्के लोकसहभाग अपेक्षित आहे. तरच लोकशाही बळकट झाली असे म्हणता येईल. मात्र मागील निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितल्यास अपवाद वगळता सरासरी ५० ते ६० टक्के मतदान होताना दिसून येते. या निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही कामाला लागली होती.वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदार जागृतीचे भव्य फलक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करीत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागातील सामाजिक संघटनांनीही उडी घेतली होती. या सोबतच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मतदानासाठी नागरिकांना प्रेरीत करण्यासाठी शपथ दिली.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनीही ही शपथ घेतली आहे. मागील काही दिवसांपासून प्रचार रॅल्यांप्रमाणेच मतदार जागृतीचे कार्य जोरात सुरू आहे. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल, असे एकंदर चित्र वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात बघायला मिळत आहे. २००९ च्या निवडणुकीत केवळ ६५.४२ टक्के नागरिकांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्येही महिला मतदारांची टक्केवारी केवळ ६१.३८ इतकी होती, तर पुरुष मतदानाची टक्केवारी ६९.०९ इतकी होती. यातही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)
मतदानाचा टक्का वाढविण्यावर प्रशासनाचा भर
By admin | Published: October 13, 2014 11:25 PM