वर्धा : पोलीस दलातील ‘टोपी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण सध्या याच टोपीचा अनेक पोलिसांना विसर पडला आहे. ‘ऑन ड्यूटी’ ‘वर्दीचा थाट’ मिरविणारे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची पाठ फिरताच टोपी खिशात घालताना दिसत आहेत. त्यांची टोपीची ही ‘ॲलर्जी’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना असलेली टोपीची ‘ॲलर्जी’ नवीन नाही. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील कर्मचारी विनाटोपी वावरताना दिसतात. पोलीस ठाण्यात असताना स्थानापन्न स्थितीत टोपी घालणे बंधनकारक नसले तरी ‘ऑन ड्यूटी’ रस्त्यात बंदोबस्तावर असतानाही अनेक कर्मचारी रिकाम्या डोक्यानेच उभे राहत असल्याचे दिसतात. काही जण वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर टोपी घालून अधिकाऱ्याची पाठ फिरताच टोपी खिशात कोंबतात.
पूर्वी सायकलवरून पोलीस जात होते. अंगात खाकी वर्दी, डोक्याला टोपी, सायकलला काठी असा एक वेगळाच रुबाब होता. आता काठी गायब झाली आहे. टोपी दिसतच नाही. काठीचे तर खूप महत्त्व आहे. आंदोलन किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हातात काठी दिसते.
ॲलर्जी का...?
- शासनाकडून पुरविली जाणारी टोपी सुताची असते.
- पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुती टोप्या लगेच खराब होतात.
- धुतल्यानंतर तिचे धागे निघतात. रंगही जातो.
- टोपीची घडी बसत नाही. त्यामुळे खिशात ठेवता येत नाही.
शंभर रुपयांत हवालदाराची टोपी
खासगी ठिकाणी बनविलेल्या पोलीस टोप्यांचे कापड ‘इम्पोर्टेड’ तसेच वजनाला हलके असते. त्यामुळे बहुतांश पोलीस सरकारी ऐवजी ‘इम्पोर्टेड’ टोप्या वापरतात. कॉन्स्टेबलपासून सहायक फौजदारापर्यंत कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी टोपी शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. पोलीस कर्मचाऱ्यांना गांधी टोपीसारख्या निळ्या रंगाच्या टोपीप्रमाणेच ‘राऊंड कॅप’ वापरण्याची मुभा आहे. काही कर्मचारी अशा कॅप वापरतात; मात्र बहुतांश जण टोपीसह कॅपही वापरण्यास टाळाटाळ करतात.
निळा रंग, प्रामाणिकपणा, एकनिष्ठतेचे प्रतीक
पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना निळ्या रंगाची टोपी आहे. निळा रंग हा प्रामाणिकपणा व एकनिष्ठतेचे प्रतीक मानला जातो. टोपीला पुढच्या बाजूस लाल रंगाची कापडी पट्टी असते. लाल रंग हा त्यागाचे प्रतीक असून कर्मचाऱ्यांनी देश व देशवासीयांप्रती त्यागाची वृत्ती जोपासावी हा त्यामागचा उद्देश असतो.
शासनाकडून हे मिळते...
- वर्दीचे कापड
- टोपी
- लाठी
- मच्छरदाणी
- ट्रॅव्हलबॅग
- लेससह शिट्टी
- वॉटरबॅग