राजपत्रानुसार आडनावातील बदल कार्यालयाला मान्य नाही देवळी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पेन्शनधारक कामगारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाच्या राजपत्रानुसार कामगाराच्या आडनावात झालेला बदल या कार्यालयाला मान्य नाही. सुधारीत नावाने सेवानिवृत्ती वेतन देण्यास हे कार्यालय तयार नसल्याने येथील प्रभाकर चव्हाण यांची गत सहा महिन्यांपासून भटकंती सुरू आहे. कार्यालयाच्या या हेकेखोर धोरणामुळे चव्हाण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग येथे प्रभाकर चव्हाण हे कामगार म्हणून कार्यरत होते. याठिकाणी काम करीत असताना त्यांच्या वेतनातून पीएफ कपात केला जात होता. आयुष्यातील २७ वर्षेपर्यंत सेवा दिल्यानंतर त्यांना लेबर अॅक्टनुसार २००९ पासून पेन्शन लागू झाली. तत्पूर्वी २००७ मध्ये त्यांनी आडनावात बंजारा समाजाचे रितीरिवाजानुसार बदल करून घेतला होता. त्यांचे आधीचे आडनाव पालथे होते; पण पालथे हे आडनाव कुटुंबीयांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते. यामुळे त्यांनी आडनावात पालथे ऐवजी चव्हाण, असा बदल करून शासनाच्या राजपत्रात तशा प्रकारची नोंदही करून घेतली होती. राजपत्रात नावाची सुधारणा झाल्याची प्रत त्यांनी नागपूर येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दिली. शिवाय चव्हाण या आडनावाची सुधारीत नोंद करून घेण्याची विनंतीही केली. त्यानुसार पीपीओ नंबर ७५११६ याप्रमाणे देवळीच्या स्टेट बँकेत प्रती महिना एक हजार याप्रमाणे पेन्शन जमा होऊ लागली. ही पेन्शन २००९ ते २०१५ च्या अखेरपर्यंत सुरळीत सुरू होती. यानंतर या कार्यालयाने एकाएकी पालथे आणि चव्हाण हे दोन वेगवेगळे व्यक्ती असल्याचा जावईशोध लावला. याच कारणातून चव्हाण यांच्या नावावरील पेन्शन बंद करण्यात आली. कार्यालयाच्या अज्ञानामुळे या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाचा तुघलकी कारभार
By admin | Published: August 19, 2016 2:11 AM