लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. शासनाकडून वारंवार कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले जात आहे; पण, कर्मचारी संपावर कायम असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. यातून सध्यातरी काही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने लालपरी अद्यापही आगारातच बंद झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वर्धा विभागातील पाचही आगारामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ६१ चालक-वाहकांपैकी ४९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५ चालक तर ४४ वाहकांचा समावेश आहे. विभागीय कार्यालयाकडून सर्व ६१ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून किती जणांना नोटीस प्राप्त झाला, याची माहिती घेतली. नोटीस मिळाल्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने ४९ जणांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर उर्वरित १२ कर्मचाऱ्यांचीही येत्या दिवसात सेवा समाप्तीचे आदेश काढले जाईल, असे सांगण्यात आले.
६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदिवाळीच्या हंगामात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने महामंडळाने त्यांच्या महागाई व घरभाडे भत्त्याची मागणी लागलीच मान्य केली. पण, लगेच दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, ही मागणी घेऊन आंदोलन कायम ठेवल्याने लालपरीची चाके ठप्प पडली. प्रवाशांचे हाल आणि उत्पादनात होणारा तोटा लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी आंदोलनावर कायम असल्याने सुरुवातीला पाचही आगारातील ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वर्धा विभागांतर्गत पाचही आगारामध्ये रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबरला नोटीस बजावून २४ तासात कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, ते कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने ४९ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले. उर्वरित १२ चालक-वाहकांना नोटीस मिळाली की नाही याची शहानिशा करून कारवाई केली जाईल.- चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक.