वर्धा : नगर परिषद व वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने गुरुवारी शहरातील बजाज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात रस्त्याच्या कडेला छोटे दुकान थाटून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची दुकाने काढण्यात आली. पालिकेच्या व पोलिसांच्या या मोहिमेचा बडगा केवळ छोट्या व्यवसायिकांवरच उगारल्या जातो, मोठ्यांना मात्र अभय दिले जाते, असा आरोप होत आहे. येथील बसस्थानक परिसर व महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर करण्यात आलेले अतिक्रमण पालिका व पोलीस विभागाच्यावतीन आठवड्यापूर्वी काढले होते. यावेळी शहरातील बाजार परिसरात असलेले अतिक्रमणही काढण्यात येईल, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले होते. अतिकमण हटाव मोहीम शहरातील अतिक्रमण काढल्याशिवाय शांत बसणार नाही, असे पालिकेच्या अभियंत्याने सांगितले होते. मात्र बोलल्यानुसार त्यांच्याकडून कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. ही मोहीम दोन दिवसातच थंडावली. बाजार परिसरातील दुर्गा टॉकीज मार्गावरील काही दुकानमालकांना समज देत व पटेल चौक परिसरातील काही चहा व पानटपरी चालकांची दुकाने तोडून ही मोहीम पालिकेत पुन्हा जमा झाली. बाजार परिसरात रस्त्यावर साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आज राबविण्यात आलेली मोहिमही केवळ छोट्या व्यावसायिकांकरिताच असल्याचे दिसून आले. या मोहिमेत रस्त्याच्याकडेला असलेल्या फळविक्रेत्यांनाच हटविण्यात आले. शिवाय रस्त्याच्या कडेला चहा व पानटपरी सुरू करून व्यवसाय करणाऱ्यांवरच पुन्हा कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. याचा विचार पालिकेच्यावतीने करावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
‘अतिक्रमण हटाव’चा बडगा केवळ छोट्या व्यावसायिकांवरच
By admin | Published: April 10, 2015 1:46 AM