बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रहदारीच्या हद्दीत विटांचा खच; दुकानेही आलीत रस्त्यावरसेलू : विकास चौकातून घोराडकडे जाणाऱ्या बोरधरण मार्गावरील दोन किमी रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्यावरच विटाचा ढीग रचण्यात आल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.बोरधरण फाटा म्हणून ओळख असलेल्या विकास चौकातून बोरधरण, कवडस मार्गे नागपूर तर नवरगाव, काटोलकडे जाणारा रस्ता आहे. याच विकास चौकात मोठ्या प्रमाणात दुकानदारी असून त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण केले आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावर पाटबंधारे विभाग, पंचायत समिती व तहसील कार्यालय आहे. वाहनांची वर्दळ पाहता हा चौक दिवसभर गजबजलेला असतो. याच चौकातून एक ते दीड किमी अंतर असलेल्या घोराडपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला दुकानांच्या ओळी आहेत. सेलू ते घोराडच्या मधोमध रहदारी हद्दीत विटांचा खच कित्येक दिवसांपासून रचून ठेवण्यात आला आहे. येथे संत केजाजी महाराज मुकबधीर शाळा आहे. या शाळेच्या क्रीडांगणात येथील विद्यार्थी वावरत असून हा विटांचा खच धोकादायक ठरत आहे. या विटा कुणाच्या, याचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे. याच विकास चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून अधिकारी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
सेलू-घोराड रस्त्यावर अतिक्रमण
By admin | Published: September 18, 2015 1:56 AM