वर्धा : जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा पेरा संपण्याच्या मार्गावर असतो़; मात्र यंदा चित्र उलटेच आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४५२ हेक्टरवर पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यातही झालेली नोंद केवळ कपाशीची असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनचा पेरा अद्याप झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.साधारतत: मृग नक्षत्राच्या पावसात शेतकरी पेऱ्याला सुरुवात करतो. आर्द्राच्या सुरुवातील त्याचा पेरा संपतो; मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने तसे होत नसल्याचे चित्र आहे. मृग कोरडा गेला. यामुळे आर्द्रात पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. यात आर्द्रातही पावसाचा पत्ता नाही. आज ना उद्या पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत असताना काहींनी पेरण्या केल्या. मृगात आलेल्या तुरळक सरींनी काहींचे बियाणे अंकुरले. पुन्हा पाऊस येईल असे वाटत असताना पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेले बियाने सुकण्याच्या मार्गावर आले आहेत.जिल्ह्यात केवळ कपाशीचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यातही जिल्ह्यात केवळ तीनच तालुक्यात पेरा झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात वर्धा तालुक्यात ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. आर्वी तालुक्यात ८० तर कारंजा (घाडगे) तालुक्यात केवळ ७० हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. गत हंगामात जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यंदाची परिस्थिती मात्र तशी नाही. जिल्ह्यात अद्याप सोयाबीनचा पेरा झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. वास्तविकता मात्र वेगळीच झाली. जिल्ह्यात कपशीसोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीचे बियाणेही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी टाकून ठेवले आहेत. काही भागात आलेल्या पावसाच्या एक दोन सरींनी पेरलेले बियाणे उगविले आहेत. पाऊस आले नसल्याने अंकुरलेले बियाणे करपण्याच्या मार्गावर आले आहेत. तर काही भागात शेतकऱ्यांनी पेरलेल बियाणे पक्षी व उंदरांनी फस्त केले आहे. या कारणाने यंदा मोड येण्याची मोठी शक्यता बळावली आहे.यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)
जूनअखेरीस केवळ ४५१ हेक्टरवर पेरा
By admin | Published: June 28, 2014 12:32 AM