१ लाख हेक्टरवर क्षेत्र : ६,९५४ मध्ये गहू तर २०,१७४ हेक्टरात हरभरा रूपेश खैरी वर्धाखरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रबीबर लागल्या होत्या; पण जमिनीत ओलावा नसल्याने रबीचा पेराही सध्या अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार १०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. हा आकडा प्रत्येक वर्षाचा असून यात सरसरी ५४ हजार ५०० हेक्टरवर पेरा होत असल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पेरा होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत २७ हजार ५१६ हेक्टरवर पेरा झाल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची झाली. जिल्ह्यात २० हजार १७४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ६ हजार ९५४ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. या तुलनेत रबी ज्वारीचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात २५७ हेक्टरवर ज्वारी तर १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा करण्यात आला आहे.जिल्ह्यात ओलिताचा पेरा वाढवा व झालेल्या पेरणीचे ओलित करता यावे यासाठी जलसाठ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ओलित करण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून रबीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रबी हंगामातील पेरणी होण्याचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. यामुळे पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून हा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. रबी ज्वारीचा पेरा २५७ हेक्टरवरजिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात ज्वारीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्यावतीने देण्यात आले होते. यामुळे येत्या काळात सदैव जानवणारी वैरणाची समस्या निकाली निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती; पण जिल्ह्यात केवळ २५७ हेक्टरमध्येच ज्वारीचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्वारीच्या पेऱ्यामध्ये वाढ होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची समस्या निकाली निघावी यासाठी जिल्ह्यात मक्याचा पेरा होत असल्याचे दिसून येते. यात जिल्ह्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यात एकूण १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. ज्वारी आणि मक्याचा पेरा वाढल्यास गुरांच्या चाऱ्याची समस्या संपुष्टात येऊ शकते; पण पक्षी, प्राण्यांच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या पेऱ्यात वाढ होत नसल्याचे वास्तव आहे.
नोव्हेंबरअखेर रबीचा पेरा २७ टक्के
By admin | Published: December 02, 2015 2:17 AM