मिलिंद पगारे : एन्व्हायर्नमेन्टल रिसर्च अॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीचा जनजागृती उपक्रम सेलू : प्लास्टीकचा अनिर्बंध वापर मानवी जीवनास अतिशय घातक आहे. असे असताना सुद्धा आज प्रत्येकजण प्लास्टीकचा दैनंदिन वापर करीत असतो. त्यामुळे पर्यावरण परीसंस्था धोक्यात आल्या आहेत. माणसाने सतर्क होऊन याबद्दलच्या उपायांची कास धरून कृतिशील होणे आवश्यक आहे. अन्यथा मानव त्याच्या सर्वनाशास जबाबदार ठरू शकतो, असे प्रतिपादन प्लास्टिक निर्मूलन उपक्रमाचे नाशिक येथील कार्यकर्ते मिलिंद पगारे यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयात एन्व्हार्मेंटल रिसर्च अॅण्ड कन्झर्वेशन सोसायटी इंडिया यांच्या स्टुडंट विंग तर्फे युवकांकरिता प्लास्टीकचा अनिर्बंध वापराचे दुष्पपरिणाम आणि उपाय यावर कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रात्यक्षिकासह चित्रफितीद्वारे व्याख्यान झाले. पगारे यांनी युवकांसोबत संवाद साधला. प्राचार्य सतीश रघुवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर संघटनेचे अध्यक्ष व वन्यजीव युवा संशोधक पराग दांडगे, संयोजक प्रा. राजेश मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन करताना प्लास्टिकच्या वापराने मानवाला कर्करोगाचा धोका असतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र मुंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थी गटाच्या कार्यातील उपक्रमाचे महत्व सांगून प्लास्टीक निर्मुलनासाठी त्यांच्या पूनर्वापराचे सुत्र सर्वांनी अवलंबावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला युवा वर्गाची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले.(तालुका प्रतिनिधी) प्रात्यक्षिकातून माहिती प्रात्यक्षिक चित्रफितीद्वारे प्लास्टीकच्या अनिर्बंध वापराची भयावहता स्पष्ट करताना प्लॉस्टीक कचऱ्याची विल्हेवाट हा निर्मुलनाचा उपाय नसून त्याचा पूनर्वावर करणे हाच या संकटातून सुटण्याचा मार्ग आहे, हे नमूद केले. याविषयी बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. पॉलीथीनचा कमीतकमी वापर करून निसर्गातील अन्य जैविक घटकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराने पृथ्वी धोक्यात
By admin | Published: January 12, 2017 12:30 AM