लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गावाबाहेरील इंग्रजकालीन पुलाची अत्यंत जीर्ण अवस्था झाली होती. हा पूल केव्हाही वाहून जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. अतिवृष्टीने येणाऱ्या पुराच्या पाण्याचा तडाखा जीर्ण पूल सहन करू न शकल्याने सोमवारी रात्री नाल्याला आलेल्या पुराने पुलाने अखेर दम तोडला. यामुळे मात्र नागरिकांचे आवागमन बंद झाले असून, नवीन पुलाची निर्मिती केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे. (The landy bridge at Hingani in Wardha district was destroyed)
लेंडी पुलापलिकडे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, यशवंत विद्यालय, स्मशानभूमी तसेच बोरधरणाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने नागरिकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. लेंडी नाल्यावर असलेल्या अरुंद पुलाचा रस्ता ज्या दगडी भिंतीवर उभा होता, त्याचे दगड मागील काही दिवसांपासून आपली जागा सोडत होते. त्यामुळे हा पूल खचू लागला होता. धोक्याची घंटा देणाऱ्या पुलाची भिंत पाण्याच्या पृष्ठभागावरून कुरपत होती; मात्र याकडे कुणाचेही लक्ष नसून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर पूल खचलाच.
लेंडी नाल्याला जंगल भागातून मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे नाल्यातील पाण्याला फोर्स असतो. या अरुंद पुलापलीकडे काही शेतकऱ्यांच्या शेती असल्याने दुचाकीसह चारचाकींची वर्दळ असते. जि.प. सदस्य राणा रणनवरे, सेलू पं.स.चे सभापती अशोक मुडे याच गावाचे असून, हिंगणी गाव विकासापासून कोसे दूर असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. नवीन पुलाची तत्काळ निर्मित करण्याची गरज असून, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग येते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.