लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. यावर्षी प्रखर उन्हाळा संपून दीड महिना झाला. पाऊसही बऱ्यापैकी झाला आहे. असे असताना वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेताना दिसतात. शहरात शिरणाऱ्या या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीने आश्रय दिला आहे. आर्वी येथे मागील पाच दिवसांत तीन जखमी हरीण मिळाले. त्यात एक भेडकी व दोन चितळ नामक हरिण होते. यातील भेडकी ही काकडधरा येथे कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत आढळली. समिती सदस्यांनी तिच्यावर उपचार करून पिपल फॉर अॅनिमल वर्धा येथे उपचाराकरिता पाठविले. एक चितळ हमालपुरा येथे जखमी अवस्थेत आढळले. ते पर्यावरण बचाव समितीच्या सदस्यांनी उपचार केले. त्याची परिस्थिती सुधारल्यावर आर्वी वनविभागाचे शिवाजी सावंत यांच्या निगराणीत सारंगपूरी येथे सोडले. दुसरे चितळ जनतानगर येथे जखमी अवस्थेत असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले होते. नागरिकांचे सहकार्य व वनविभागाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्या चितळावर उपचार करण्यात आले; पण गंभीर जखमी असल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही समिती वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.
शहरात शिरलेल्या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीचा आश्रय
By admin | Published: July 14, 2017 1:32 AM