वर्धा : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे नुकसान १ लाख ६ हजार वृक्ष लागवड करून भरून काढले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावणीत शेतकऱ्यांना सांगितले. नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या पॅकेज १ मधील नागपूर ते पिंपळगाव(वर्धा) दरम्यानच्या प्रकल्पात जाणाऱ्या भूधारकांसाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी विकास भवन येथे गुरूवारी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी हे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे उपस्थित होते. प्रकल्पातील रस्त्याच्या बांधकामात होणारी वृक्षतोड व पर्यावरणविषयी अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्तर देताना नरेंद्र टोपे म्हणाले, प्रकल्पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्प भागात हवेतील गुणवत्ता, ध्वनीची पातळी, माती व पाण्याची गुणवत्ता विचारात घेतली जाईल्. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. जमिनीची धूप कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहे. प्रकल्प बांधकामात वापरण्यात येणारी वाहने प्रदुषण मुक्त प्रमाणीत करुनच वापरण्यात येईल. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे करणार आहे. यानंतर भूधारकांनी भूसंचयन व शेतीच्या मोबदल्याविषयी तक्रारी मांडल्या. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
समृध्दी महामार्गावर पर्यावरण जनसुनावणी
By admin | Published: March 24, 2017 1:55 AM