लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आत्महत्या शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘जेंडर टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती, मुलांचे शिक्षण, प्राप्त मदत अशा विविध बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ‘जेंडर टास्क फोर्स’ मध्ये जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महिला किसान अधिकार मंचचे प्रतिनिधी, महिला उपजिल्हाधिकारी, समाज कल्याण संस्था प्रतिनिधी यांचा समावेश राहील, असा निर्णय विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी घेतला आहे. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार रवींद्र माने, महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुळकर्णी, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सुवर्णा दामले, नुतन माळवी, शुभदा देशमुख, आरती बैस आदी उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी बनेल वारसशेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद होणे अपेक्षित आहे; पण अनेक शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद न झाल्याने त्या शासकीय योजनांपासून वंचित आहेत.त्यांना त्यांचा हक्क मिळावा या दृष्टीने जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीकरिता हेल्पलाईनशेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या समुपदेशन चमूच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण देण्यासोबतच कार्यशाळादेखील घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन तसेच महिला किसान अधिकार मंचच्या मदतीने या हेल्पलाईन केंद्राचे कामकाज चालेल.