वर्धा : बाप्पामुळे दहा दिवस चैतन्यमय वातावरण होते. अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस गुरुवारी उजळला. गणपती बाप्पा मोरय्या...पुढल्या वर्षी लवकर या...असा जयघोष करीत वर्धेकरांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला. यातच गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करून पर्यावरण बचावचा संदेशही दिला. दहा दिवस बाप्पाची पूजा-अर्चना केल्यानंतर मूर्तीचे नदी-नाल्यात विसर्जन केले जाते. निर्माल्यही तेथेच फेकले जाते. यामुळे नदी-नाल्याचे पाणी दूषित होते. शिवाय पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. या विचाराने प्रेरीत झालेल्या हजारावर नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तीचे पर्यावरणपूक पद्धतीने विसर्जनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. बाप्पाच्या आगमणाची चाहुल लागताच ‘लोकमत’ने प्लास्टर आॅफ पॅरीसऐवजी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाचा बचावासाठी बातम्यांच्या माध्यमातून जागर केला होता. वर्धेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे विसर्जनादरम्यान दिसून आले. १५-२० मूर्ती सोडल्यातर उर्वरीत मूर्ती मातीच्याच असल्याचे लक्षात आले. बाप्पाचे आगमण झाल्यापासून गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याबाबत जागर करण्यात आला. याच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची गत वर्षी जागृती करणाऱ्या वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने हनुमान टेकडीवर तयार केलेल्या कुंडात गणेश विसर्जनाकरिता आलेल्या मूर्तींची महाआरती करण्यात आली. या महाआरतीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्यासह वैद्यकीय जनजागृतीमंचाचे सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती. महाआरतीनंतर येथे आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन त्या कुंडात करण्यात आले. पर्यावरण बचावसाठी यंदा शहरातील विविध संघटना सरसावल्या. शहरातील ठिकठिकाणी पाण्याचे हौद भरुन ठेवण्यात आले होते. तसेच निर्माल्य दानासाठीची व्यवस्थाही तेथेच करण्यात आली. हनुमान टेकडीवर गणेश विसर्जनाकरिता रात्री उशिरापर्यंत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. रात्री ७.३० वाजतापर्यंत ८५० वर मूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याचे वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्वाध्याय मंदिर परिसरात लायन्स क्लब, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आचार्य श्रीमन्नारायन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केलेली होती. येथे ४५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वर्धा नगर पालिकेच्यावतीने शहरातील धुनिवाले चौक, सोशालिस्ट चौक व आर्वी नाका चौक येथे पाण्याचे हौद ठेवण्यात आले होते. ती तिनही ठिकाणी ११८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शिवाजी चौकात अग्निहोत्री तंत्रनिकेतन नागठाणाच्यावतीने पाण्याचा हौद ठेवला होता. येथे ६३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरूच असल्याने हा आकडा वाढतच होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वर्धेत बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप
By admin | Published: September 16, 2016 2:51 AM