वर्धा : होळी सणानंतर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. ऐरवी मे महिन्यात जिल्ह्यात जिवाची काहिली करणारे ऊन राहते; पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच मे हिटचा अनुभव वर्धेकरांना येत असल्याचे वास्तव आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांत समाधानकारक जलसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी जलाशयांमधील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाज चुकल्यास वर्धेकरांना पावसाळ्यापूर्वी पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्याचे तातडीने योग्य नियोजन करण्याचे, तसेच प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात अकरा मोठे व मध्यम जलाशय
जिल्ह्यात बोर, निम्न वर्धा, धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन प्रकल्प, मदन उन्नई, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी, असे एकूण अकरा मोठे व मध्यम जलायश आहेत. हीच जलाशय वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची तृष्णातृप्ती करतात.
धाम वर्धेकरांसाठी आधारवड
महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील किमान २० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढतो. त्यामुळे हा प्रकल्प वर्धेकरांसाठी आधारवडच आहे; पण याच जलाशयातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढत्या उन्हामुळे वाफ झाल्यास वर्धेकरांवर जलसंकटच ओढावणार आहे.
धामच्या पाण्याची पळवापळवी, तरी अधिकारी मूग गिळून
यंदाच्या वर्षी धाम प्रकल्पातून सिंचनासाठी तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. आता केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाणार आहे; पण पिण्यासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याची उचल काही कारखाने व कंपन्या करीत असतानाही वर्धा पाटबंधारे विभागाचे अधिकारी मूग गिळून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महिला अधिकाऱ्याला वर्धेला यायची ॲलर्जी
वर्धा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सुनील रहाणे हे सेवानिवृत्त झाल्यावर येथील कामकाजाचा प्रभार नागपूर येथील महिला अधिकारी नीतू चव्हाण यांना देण्यात आला आहे; पण या महिला अधिकारी वर्धा येथील कार्यालयात येतच नसल्याची ओरड सध्या वर्धा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.