वर्धा : नांदेडच्या एका १९ वर्षीय युवकास शस्त्रक्रिया करीत मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात सावंगीच्या डॉक्टरांना यश आले आहे. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील कान, नाक व घसारोग विभागात ही रक्तगाठीची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. शासनाच्या महात्मा जाेतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पार पडली.
नांदेड जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुण रुग्ण नाकातून सतत रक्तस्राव होत असल्याने सावंगी रुग्णालयातील कान, नाक व घसारोग विभागात भरती झाला होता. रुग्णाला नाकावाटे श्वास घेणेही कठीण झाले होते. या विभागातील तज्ज्ञांनी रुग्णाची तपासणी केली असता अँजिओफायब्रोमा म्हणजेच नाकात रक्ताची गाठ निर्माण झाल्याचे निदान झाले. रुग्णाच्या जांभाड्याला चिरा देऊन ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली जाते. यात अनेकदा अतिरक्तस्रावामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.
अँजिओफायब्रोमाची ही शस्त्रक्रिया आधुनिक तंत्राचा वापर करून दुर्बिणीद्वारे करण्याचा निर्णय कान, नाक व घसारोग शल्यचिकित्सक डॉ. सागर गौरकर व डॉ. चंद्रवीर सिंग यांनी घेतला. या प्रक्रियेत इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. पंकज बनोदे, डॉ. शुभम, डॉ. प्रचिता यांची मदत घेत नाकातील गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीचा प्रवाह खंडित केला. यानंतर डॉ. गौरकर, डॉ. सिंग यांच्यासह डॉ. फरहद खान, डॉ. आयुषी घोष, डॉ. गौतम, डॉ. अभिजित शर्मा, डॉ. निमिषा पाटील, डॉ. जसलीन कौर, डॉ. परिणिता शर्मा, डॉ. हर्षल दोबारिया, डॉ. जया गुप्ता, डॉ. स्मृती या चमूने नाकातून दुर्बिणीद्वारे व कोआबलेटरच्या साहाय्याने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली.
कमीतकमी रक्तस्राव आणि वेदनारहित उपचार झाल्याने रुग्णाने व त्याच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. ही शस्त्रक्रिया महात्मा जाेतिबा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्णत: मोफत करण्यात आली असून रुग्ण व्याधीमुक्त होऊन स्वगृही परतला.
- प्रसाद देशमुख, विभाग प्रमुख, कान- नाक- घसा विभा