लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना किंवा इतर कुठल्याही विषाणू किंवा जीवाणूंमुळे होणाऱ्या श्वसनजन्य संक्रमणात लक्षणे ही कमी अधिक प्रमाणात एक सारखीच असतात. पण, इतर विषाणूच्या तपासणीकडे दुर्लक्ष करुन केवळ कोरोनाच्याच तपासणीवर भर दिल्या जात आहे. त्यातही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरीही मृत्यूचे कारण क्लिनिकली कोरोनाच द्या, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिले आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा विनाकारण वाढणार असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशभरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव व्हायला लागल्यानंतर या आजाराला वास्तवापेक्षा अधिक भयंकर असल्याचे समाजापुढे मांडले जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने आणखीच भर पडली आहे. आपल्या देशात दरवर्षी जवळपास २५ लाख मृत्यू हे संक्रमणाने होत असतात. यापैकी वेगवेगळ्या श्वसनजन्य संक्रमणाने दरवर्षी ३ लाख ४० हजार व टीबीने जवळपास ३ लक्ष ७५ हजार मृत्यू होतात. परंतु, सध्या इतर श्वसनजन्य विषाणूसाठी चाचणी न करता फक्त कोरोना चाचणी केली जात आहे. त्या आधारे मृत्यूचे कारणही केवळ कोरोनाच दिले जात आहे. विशेषत: त्या व्यक्तीची कोरोना चाचणी निगेटिव्ह किंवा अनिर्णयीत असली तरीही मृत्यूचे कारण क्लिनिकली कोरोनाच दिले जात असल्याने कोविड मृत्यूंची संख्या विनाकारण वाढणार असून यातून जनतेची दिशाभूल होईल, असेही मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
आपल्याला हे समजून घ्यावे लागले की बऱ्याच केसेसमध्ये एकच विषाणू हा मृत्यूला कारणीभूत नसतो; तर, बरेचशे इतर जीवाणू व विषाणू सोबत कारणीभूत असतात. सध्या आपण इतर विषाणूसाठी चाचणी न करता फक्त कोरोना चाचणी करतोय. अशा वेळी इतर विषाणू किंवा जीवाणू जे दरवर्षी लाखो मृत्यूस कारणीभूत ठरतात; त्यांची चाचणी न करता फक्त कोरोनाचीच चाचणी करून मृत्यूचे कारण कोरोना देणे हे वैद्यानिकदृष्ट्या चुकीचे आहे.- डॉ. इंद्रजीत खांडेकर, प्राध्यापक न्यावैद्यक शास्त्र. वर्धा