जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार : शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर रूपेश खैरी वर्धासर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेतून जे विद्यार्थी वंचित राहत होते त्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून गणवेश देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार सर्व पंचायत समित्यांना विद्यार्थ्यांच्या तुलनेत रक्कम पाठविणे अनिवार्य असताना जिल्हा परिषेदेने पटसंख्येच्या तुलनेत वर्धा तालुक्यात कमी रक्कम दिली. परिणामी परीक्षेची वेळ आली तरीही वर्धा तालुक्यातील तब्बल १ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यांचे शैक्षणिक सत्र जुन्याच गणवेशावर जाणार हे मात्र सत्य. शासनाच्या योजनेनुसार अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वच मुलींना मोफत गणवेश देण्यात येतो. या विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेनुसार गणवेश देत असताना या योजनेत समाविष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र दु:खाची किणार दिसत होती. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर या घटनेचा विपरीत परिणाम होवू नये म्हणून योजनेत समाविष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून गणवेश पुरविण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला. या ठरावानुसार ही विशेष योजना राबविण्याकरिता २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेतून जिल्ह्यातील आठही पंचायत समितीतील तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठरले. पंचायत समितीस्तरावर असलेल्या शाळांतील पटसंख्येनुसार आवश्यक निधी पुरविण्यावर शिक्का मोर्तब झाले. यानुसार निधी वितरीत करणे आवश्यक असताना वर्धा पंचायत समितीला गरजेच्या तुलनेत कमी निधी देण्यात आला. वर्धा तालुक्यात १ हजार ९३५ विद्यार्थी असताना येथे मिळालेल्या निधीत केवळ ९३५ विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळाला आहे. यामुळे शैक्षणिक सत्र शेवटात असतानाही तालुक्यातील तब्बल १ हजार विद्यार्थ्यांवर गणवेशापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. देवळीतील अतिरिक्त रक्कम वर्धेला देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देवळी तालुक्यातील तब्बल ३ लाख ६० हजार रुपये देण्यात आले आहे. मात्र येथे विद्यार्थी संख्या कमी असल्याने केवळ १ लाख ८७ हजार रुपयांचीच गरज होती. यामुळे १ लाख ७३ हजार रुपये वर्धा पंचायत समितीला परत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र यंदाचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना देवळी पंचायत समितीकडून कुठलाही निधी वर्धा पंचायत समितीला प्राप्त झालेला नाही. देवळी पंचायत समितीला पत्र देवूनही त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याने येथील अधिकाऱ्यांना स्मरण पत्रही देण्यात आले आहे. तरीही वर्धा पंचायत समितीला अद्याप निधी प्राप्त झाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर यंदाचे सत्र जुन्याच गणवेशावर काढण्याची वेळ आली आहे. यंदाच्या सत्रातील रक्कमेतून नव्या सत्रातील गणवेश ?सुरू शैक्षणिक सत्रात मंजूर झालेल्या निधीतून वर्धा तालुक्यातील १००० विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. देवळीला गेलेला अतिरिक्त निधी वर्धा पंचायत समितीला मिळाला नाही. यामुळे यंदाच्या सत्रात या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे शक्य नाही. परिणातील यंदाच्या सत्रातील रकमेतून येत्या सत्रात गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागात सुरू झाल्याची माहिती आहे.
परीक्षा आली तरी वर्धेतील १००० विद्यार्थी गणवेशाविना
By admin | Published: March 03, 2017 1:45 AM