वर्धा : शेकडो वर्षे स्वत्त्व हरवून बसलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमानाचा अंकुर फुलविणाऱ्या रयतेकरिता शिवरायांचा राज्याभिषेक ही घटना गौरवास्पद तर होतीच; शिवाय इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगपटू प्रशांत रोकडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, संभाजी ब्रिगेड, युवा सोशल फोरम, ओबीसी युवक क्रांती दलातर्फे येथील विश्रामगृह येथे शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रोकडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, संभाजी ब्रिगेडचे मंगेश विधळे, जीवन चोरे, प्रवीण जगताप आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. परंतु धर्मवेडे नव्हते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, वाईट रुढी-परंपरा मोडीत त्यांनी काढल्या. धर्मशास्त्र गुंडाळून ठेवले. शिवाजी महाराज हे धर्मसुधारक, समाजसुधारक व मानवतावादी होते. जगावर आपलं प्रत्येक क्षेत्रात अधिराज्य निर्माण करणारा जगातील एकमेव कर्तृत्ववान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे विचार मंगेश विधळे यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर बोलताना सुधीर पांगुळ म्हणाले, उद्योग-व्यापारास चालना शिवरायांनी दिली. विविध वस्तूंना बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या. करसवलती देणे, आयात-निर्यात धोरण, स्वदेशी मालास उपयुक्त ठेवणे याकडे महाराजांनी विशेष लक्ष दिले, असे सांगितले. कार्यक्रमाला मिलिंद मोहोड, पराग भोयर, मयूर डफळे, प्रसन्ना इंगोले, श्याम बोटकुले, सतीश लांबट, पंकज अनकर, विवेक तळवेकर, सचिन हजारे, रूपेश वाघमारे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
शिवराज्याभिषेक इतिहासाला कलाटणी देणारी घटना
By admin | Published: June 08, 2015 2:34 AM