सेलू : स्थानिक बसस्थानकाची दुरवस्था झाली होती़ प्राथमिक सोयी-सुविधांचीही वाणवा होती. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य होते़ बसस्थानक परिसराला झुडपांचा विळखा होता़ याबाबत आंदोलने केल्यानंतर परिवहन महामंडळाला जाग आली़ अखेर बसस्थानकाचे काम हाती घेण्यात येऊन ते पूर्णत्वास गेले आहे़ यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे़येथील बसस्थानकावर प्रवासी, विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता़ दिवे नसल्याने काळोख, झुडपांचा विळखा, स्वच्छता गृहाची दुरवपस्था, पिण्याच्या पाण्याची असुविधा आदी अनेक समस्यांनी प्रवाशांना त्रस्त केले होते़ विद्यार्थी व विशेष: मुली, महिलांची कुंचबना होत होती़ दुरूस्तीकरिता अनेकदा आंदोलने करण्यात आली; पण उपयोग होत नव्हता़ अखेर परिवहन महामंडळाविरूद्ध बसस्थानक परिसरात बेशरमची झाडे लावण्याचे आंदोलन केले़ या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांना जाग आली व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले़ बसस्थानक दुरूस्तीसह प्रकाश व पाणी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्याची उपस्थिती आदी बाबी पूर्ण करण्यात आल्या़ यासाठी केलेल्या आंदोलनांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शुभम दांडेकर, अंकीत माहुरे, अक्षय चांदेकर, सचिन गोमासे, रोशन कोंबे, प्रणय माहुरे, लोकेश ठोंबरे, सुरज माहूरे, सुरज ठोंबरे यांच्यासह प्रवाशांनी सहभाग घेतला़(तालुका प्रतिनिधी)
अखेर बसस्थानकाचे काम झाले पूर्ण
By admin | Published: April 02, 2015 2:00 AM