शैलेश नवाल : ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे वर्धा : शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते. पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै आहे. या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. १ आॅगस्ट २०१६ नंतर मंजूर केलेल्या पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाकरिता ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. कर्जदार वा बिगर कर्जदार शेतकरी त्यांचा अर्ज अपूर्ण असल्यास विमा कंपनी त्यांचा अर्ज स्वीकारणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाची मदत घ्यावी. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा व पटवाऱ्याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केल्या जातील. शेतकऱ्यांच्या पिकाच्या कर्जाची रक्कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्यापुर्वीच्या पिकांचे नुकसान ग्राह्य धरण्यात येणार नाही. पीक विमा दावा निपटारा सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असल्याने ज्या पिकाची लागवड शेतीमध्ये करणार आहेत, तेच पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद करावे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज दोन वा अधिक बँकांकडून घेतले असल्यास त्यांचा पीक विमा एकाच बँकेचा ग्राह्य धरला जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल व अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे. खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता तसेच खरीप भुईमूंग पिकाकरिता शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अधिसूचित तालुका, पीक व मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास उपलब्ध आहे. २०१६-१७ साठी खरीप ज्वारी २४ हजार, भुईमूग ३० हजार, सोयाबीन ३६ हजार, तीळ २२ हजार, मुग १८ हजार, मका २५ हजार, उडीद १८ हजार, तूर २८ हजार तर कापूस ३६ हजार असे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा
By admin | Published: July 15, 2016 2:29 AM