लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखडा तयार करून येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक पार पडली. व या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. परंतु या आराखड्यात मुळ गावाच्या विकासाचा अंतर्भाव नसल्याने सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्राम आश्रमातील समाविष्ट कामे जलदगतीने सुरू आहे. एवढे नव्हे तर या आराखड्यात वरूड आणि पवनार या दोन गावांसाठी १७ कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या आराखड्याला सेवाग्राम नाव असले तरी मुळ सेवाग्राम गावाच्या विकासासाठी निधीचा अंतर्भाव करण्यात आला नाही. सेवाग्राम गाव राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे जगात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून पर्यटक, अभ्यासक येथे येतात. मात्र मुळ सेवाग्राम गावात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. गावात कस्तुरबा रुग्णालय, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय, प्राकृतिक चिकित्सा विद्यापीठ आदी मोठ्या संस्था आहे. सेवाग्रामचा विस्तार झपाट्याने वाढत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या या आराखड्यात सेवाग्राम गावाच्या विकास कामांना वगळण्यात आले आहे.च्२ आक्टोबर २०१७ ला सेवाग्राम येथे गांधी जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी गावातील रस्ते, भुमीगत नाल्या, गटारे व आवश्यक विकास कामे करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. अशी माहिती पंचायत समिती सदस्य भारती उगले यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु राज्य सरकारने वरूड व पवनार या दोन गावांसाठी १७ कोटीचा निधी दिला. परंतु गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामसाठी निधी देण्यात दुजाभाव दाखविण्यात आला असा आरोप यांनी उगले यांनी केला आहे. शासनाने या पुर्वी सेवाग्राम, बरबडी, नांदोरा, वरूड, कामठवाडा या ५ गावांचा समावेश केला. वरूड वगळता अन्य गावांना निधी मात्र दिला नाही. त्यामुळे जी कामे सुरू आहे. ती केवळ आश्रम व त्यांच्याशी निगडीत संस्थांमध्येच सुरू आहे.
या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून सेवाग्राम गावाच्या विकासावर अन्याय होत आहे. निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. शासन याबाबत उदासीन दिसत आहे.भारती उगले, पं.स. सदस्य, राकाँ. वर्धा