गौरव देशमुख।आॅनलाईन लोकमतवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिककरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड, दोन कोटी वृक्ष लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात आले. गावोगावी रस्ता दुतर्फा झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण झाडे किती जगली, याचा हिशेब कुठेही आढळत नाहीत. शासनाने ३२ महिन्यांत वृक्ष लागवडीवर १३ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.वनविभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामपंचायत तथा अन्य विभागांमार्फत फळबाग व वृक्ष लागवड करण्यात आली; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. २०१५-२०१६ ते २०१७-२०१८ या अडीच वर्षांत कोटीच्या घरात झाडे लावण्यात आली. या अडीच वर्षांत लावलेले वृक्ष वनविभाग, वनीकरण, ग्रा.पं., पं.स. जि.प., न.प. तथा शाळांमार्फत लावण्यत आलीत; पण किती झाडे जिवंत आहेत, याचा लेखाजोखा कुणाकडेच नाही.पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधाण येते; पण हिवाळा, उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनिकरण, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमार्फत एकूण ४ हजार ७८१ कामे प्रस्तावित आहेत. यात एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आला; पण झाडे जगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागवडीनंतर वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच आहे. शासन, प्रशासनाने याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात वृक्षलागवडीवर १३ कोटी खर्च; पण किती जगली याचा हिशेब नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 2:40 PM
वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो.
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न जगलेल्या झाडांचा हिशेब बेपत्ता