वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील स्लॅबच्या इमारतीत सुरू असलेला बनावट बियाणे विक्रीचा कारखाना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी उद्ध्वस्त करीत टोळीचा पर्दाफाश केला होता. मुख्य सूत्रधार राजू सुभाष जयस्वाल याच्यासह नऊ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आता राजू जयस्वाल आणि त्याचे वडील सुभाष जयस्वाल हे दोघेही मद्यशौकीन असल्याचे उजेडात आले असून, राजू जयस्वालच्या घरातून विविध नामांकित कंपन्यांचा मध्य प्रदेश येथे तयार केलेला जवळपास १ लाख ४ हजार २५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजू जयस्वालचे वडील सुभाष नत्थुलाल जयस्वाल (७२) याच्याविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी बनावट बियाणे विक्री कारखान्यावर छापा मारून याप्रकरणातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल याच्यासह नऊ आरोपींचे रॅकेट गजाआड केले होते. याप्रकरणाचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू आहे.
‘गुजरात’च्या रिकाम्या पाकिटांवर वर्ध्यात ‘प्रिंटिंग’; १४ नामांकित कंपन्यांच्या नावे बोगस बियाणे
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सेवाग्राम ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्यासह कर्मचारी राजू जयस्वाल याला घेऊन त्याच्या रेहकी येथील निवासस्थानी बोगस बियाणे प्रकरणात तपासणीसाठी गेले होते. तपासणीदरम्यान त्यांना घरामागील पडीक जागेत मध्य प्रदेश राज्यात बनविलेली महागडी विदेशी दारू दिसली. याची माहिती सेलू पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, देवराव वेलकर, अखिलेश गव्हाणे, अमोल राऊत यांनी रेहकी गाठून दारूसाठा जप्त करीत गुन्हा दाखल केला.
बियाणे कुठे विकले?
आरोपी राजू जयस्वाल याने १४ क्विंटल कपाशीचे बोगस बियाणे कृषी सेवा केंद्रांमार्फत विकले होते. पोलिस कोठडीदरम्यान राजू जयस्वाल याने १२ क्विंटल बनावट बियाणे कुठे-कुठे विकले याची माहिती पोलिसांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
एसआयटी रवाना
बोगस बियाणे प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) स्थापन केली आहे. गुजरात, अमरावती, यवतमाळसह हमदापूर येथे पथक रवाना झाले असून, तपासकार्य वेगाने सुरू आहे.