आनंद इंगोलेवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता १ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात झाली आहे. प्रारंभी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आता मुदतवाढ देण्यात आली असून २५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पालकांनी नर्सरी आणि पहिलीतील मोफत प्रवेशाकरिता तातडीने अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता जिल्ह्यातील १११ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये नर्सरी आणि पहिल्या वर्गाकरिता १ हजार १११ जागा रिक्त आहेत. या जागांकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरुझाली असून आतापर्यंत ४ हजार ६८८ अर्ज प्राप्त झाले आहे. अजून २५ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. बऱ्याच पालकांकडून ऑनलाइन अर्ज सादर करताना सर्व्हर क्षमतेपलिकडे गेल्याने साईट स्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.