वर्धा : फेसबुकवरील शक्तीवान इंजिनीअरिंगची जाहिरात पाहून शेती अवजारे रोटावेटर व इतर शेती साहित्य खरेदीच्या नावावर तब्बल १ लाख ९७ हजार ६४० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यास गुजरात राज्यातील राजकोट येथून सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अटक केली. अक्षय नरेनभाई भिंबा (२३, रा. पारडी, जि. राजकोट, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्यास ३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
प्राप्त माहितीनुसार, सचिन नारायण दानव (रा. पवनार) याला शेती साहित्य घ्यायचे असल्याने त्याने फेसबुकवर शक्तीवान इंजिनीअरिंग ट्राॅली कंपनीची जाहिरात पाहिली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करून संपर्क साधला. सचिनने शहानिशा करून रोटावेटर, नागर, तीरी पंजी, व्ही-पास एक्का अशा १ लाख ९७ हजार ६४० रुपयांच्या वस्तूंची ऑर्डर दिली. मात्र, साहित्य आले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने १२ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपासावरून आरोपी गुजरात येथील राजकोट येथून गुन्ह्याची सूत्रे हलवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने २७ ऑक्टोबर रोजी राजकोट गुजरात गाठून आरोपी अक्षयला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक राहुल ईटेकार, कुलदीप टांकसाळे, सचिन सोनटक्के, रंजीत जाधव, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनुप राऊत, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, मीना कौरती, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, विशाल मडावी, अमित शुक्ला, अनुप कावळे, अंकित जिभे, प्रतीक वांदिले, स्मिता महाजन यांनी केली.
चार दिवस राबविली शोधमोहीम
२७ ऑक्टोबर रोजी पोलिस पथक राजकोट येथे गेले. चार दिवस अहमदाबाद, राजकोट, जी.आय.डी.सी. शापर जिल्हा राजकोट येथे अहोरात्र तपास व शोधमोहीम राबवून आरोपी अक्षय भिंबा याला अटक केली. आरोपीकडून फसवणूक करण्यात आलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हॅन्डसेट, बँक अकाऊंटचे एटीएम कार्ड असा एकूण १,९७,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.