तालुक्यातील सावकारी कर्जाच्या ८५७ प्रकरणांना मंजुरीकारंजा (घाडगे) : शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली. या प्रकरणातून येथील दहा सावकारांच्या खात्यात ७३ लाख २ हजार रुपये जमा झाले. कर्जमाफीमुळे गहाण ठेवलेले सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असताना काही सावकारांकडून या शेतकऱ्यांना अधिकच्या रकमेची मागणी करून वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तालुक्यातून अधिकृत सावकारांची संख्या १० आहे. त्यांच्याकडून कर्ज घेण्यात आलेली एकूण १ हजार ४८५ कर्ज प्रकरणे माफीकरिता शासनाकडे आली होती. यात तपासणी अंती तलाठ्याच्या अहवालानुसार ८५७ प्रकरणे शासन दरबारी मंजूर झाली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२३ प्रकरणांना निपटारा होऊन १६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम सावकारांच्या खात्यात जमा करण्यात आली. संबंधीत शेतकऱ्याचे सोने परत करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ४३४ प्रकरणे मंजूर झालीत. या प्रकरणाची ७३ लाख २ हजार रुपयाचंी रक्कम सावकाराच्या खात्यात जमा करण्यात आली. सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही सावकार शेतकऱ्यांना शासनाकडून जेवढी रक्कम मुद्दल व व्याजासहीत शासन दराने मंजूर झाली त्यापेक्षा जादा रक्कमेची मागणी करीत आहे. शेतकऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांचे गहाण परत करण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशा काही तक्रारी सहायक निबंधक कार्यालयात आल्या आहेत. काही सावकारांनी सोने गहाण करताना शेतकऱ्यांना कच्चा पावत्या दिल्या आहेत. आता शासनाकडून पैसे मंजूर झाल्यानंतर कच्च्या पावत्या चालणार नाही. असे धोरण स्वीकारून शेतकऱ्यांना सोने परत करायला ते तयार नसल्याचे दिसून आले आहे. कच्ची पावती देवून अवैध सावकारी करणाऱ्या या सावकारांवर शासनाने त्वरीत कारवाई करावी, आणि रक्कम मंजूर झाली असतानाही, सोने परत देत नसल्याबद्दल कारवाई करावी, अशी तक्रार एकनाथ डोबले यांनी तहसीलदारांकडे केली आहे.सोने गहाण ठेवून कर्ज देण्याचा शासनाचा अधीकृत दर एक टक्का प्रतिमाह आहे, पण सावकारांनी मात्र अधिक व्याजदराने कर्ज दिले आहे. कोणत्याही नियमात न बसणारी ही व्याजाची जादा रक्कम सावकार शेतकऱ्यांची मागाहून अडवणूक करीत आहेत. याकडे जिल्ह्याच्या सहायक निबंधक कार्यालयाने लक्ष देत सावकारांवर कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)कागदपत्रांऐवजी अडली २०० प्रकरणेयेथील एका सावकाराकडे २०० प्रकरणे आहेत. मात्र त्याच्याकडून आवश्यक कागदपत्र शासनाकडे सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. या सावकाराकडून गहाण व हिशेबाचा रेकॉर्ड, इंकम टॅक्स, कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. हा रेकॉर्ड परत येताच त्या २०० शेतकऱ्यांचे सोने परत करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गहाण सोन्यासाठी शेतकऱ्यांकडून जादा वसुली
By admin | Published: December 04, 2015 2:12 AM