वर्धा : महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर यांचा मुलगा शंतनू (२६) याचे सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. वेगळेपण जोपासणारा हा ‘चौकट राजा’ मृत्यूनंतरही समाजाला नवी दृष्टी देऊन गेला.निसर्गत: दिव्यंगत्व लाभलेला शंतनू जन्मापासून वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत सतत आजारी होता. पुढे काही अंशी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मानसिक दुर्बलता असूनही त्याला दांडगी स्मरणशक्ती लाभल्याने अनेकांशी परिचय व अनेक कलागुणांची आवड त्याच्यात होती. भक्तीसंगीतात आणि कीर्तनात विशेष रूची असणारा शंतनू स्वत: तबलावादन व खंजरीवादन करायचा. चित्रकारितेचा छंद जोपासणाऱ्या शंतनूला शिवाजी महाराजांच्या अभिनयासाठी समाज कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला होता. मृत्यूनंतरही शंतनू समाजाच्या उपयोगी पडावा, यासाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असणारे त्याचे वडील प्रा. पद्माकर बाविस्कर व भाऊ दुष्यंत यांनी त्याचे डोळे नेत्रहिनांसाठी सावंगी रुग्णालयात दान करीत सामाजिक ऋण जोपासले.(प्रतिनिधी)
‘शंतनू’चे मरणोपरांत नेत्रदान
By admin | Published: April 21, 2017 1:52 AM