वर्धा : काही वर्षांपासून गोपालकांवर अन्याय होत आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळावा म्हणून गोपालक मुला-बाळांसह कित्येक पिढ्यांपासून जंगलाशेजारी राहतात. वन विभागाने संपूर्ण चराईबंदी केल्याने समाजाला आरोग्यवर्धत दूध पुरविणारे गोपालक अडचणीत आले आहेत. याकडे लक्ष देत गोपालकांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी होत आहे.गोपालकांचा जंगलातील चाऱ्याकरिता काही वर्षांपासून लढा सुरू आहे. यासाठी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत प्रश्न विचारून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. गोपालक गायी-म्हशींच्या खाद्यात प्रामुख्याने सरकी, ढेपीचा वापर करतो. ती सरकी, ढेप व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून भाव वाढवित नफाखोरी केली आहे. दुधाला डेअरीमध्ये प्रती लिटर २० रुपये भाव व सरकी, ढेपीला प्रती किलो २२ रुपये आहे. यात गोपालक कसा जगेल, याचा विचार करणे गरजेचे आहे. अन्य वस्तुंप्रमाणे पशुखाद्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा गोपालकांवर उपासमारीची वेळ येईल. शासनाने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेने दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अन्यायकारक निर्णयांमुळे गोपालक अडचणीत
By admin | Published: January 18, 2016 2:22 AM