प्रत्येक १५ दिवसांनी एटीएम पडतात बंद : ग्रीन चॅनल काऊंटर दोन महिन्यांपासून ठप्परूपेश मस्के कारंजा (घा.)शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वाणवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आहे त्या स्थितीत व्यवहार पार पाडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याकडे लक्ष देत बँकांतील असुविधा दूर करणे गरजेचे झाले आहे. भारतीय स्टेट बँक असो वा बँक आॅफ इंडिया आठ-आठ दिवस एटीएम मशीन बंद असतात. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एटीएमच्या प्रवेशव्दारावर दिमाखात १५-१५ दिवस एटीएम मशीन खराब, तांत्रिक बिघाडाचे फलक लागलेले असतात; पण एटीएम मशीन त्वरित दुरूस्त व्हाव्या म्हणून उपाययोजना केल्या जात नाही. बँकीेंग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञाचा वापर होत आहे; पण त्याचा नागरिकांना फायदा होताना दिसत नाही. उलट नागरिकांना कित्येक तास रांगेत ताटकळावे लागते. बँकेतील अपुरी जागा आणि बसण्याची तोकडी व्यवस्था यामुळे ग्राहकांना उभेच राहावे लागते. बँकींग क्षेत्र नागरिकांना कसे सोपे करता येईल, या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांना देव-घेवीचे रोखीचे व्यवहार करणे सोपे व्हावे म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. असे असले तरी रोखपालांचे आडमुठे धोरण आडवे येत आहे. मशीन सुरू असताना खराब असल्याची बतावणी करून नाहक त्रास दिला जातो. भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेत टोकण मशीन लावण्यात आले. याद्वारे स्क्रिनवर टोकण क्रमांक ‘डिस्प्ले’ होतो. यांनतरच नागरिकांना रोख जमा वा काढण्यासाठी खिडकीवर जावे लागते; पण रोखपाल जोपर्यंत या मशीनला ‘नेस्क्ट कमांड’ देत नाही, तोपर्यंत पुढील टोकण नंबर दिसत नाही. यात नागरिकांची रोखपालांद्वारे बोळवण केली जात असल्याचे दिसते. या तंत्रज्ञानामुळे व्यवहार सुरळीत होतील व रांग लागणार नाही, हा उद्देश असला तरी शेवटी मशीन ती मशीनच असते. त्याला ‘आॅपरेट’ करणाऱ्या कर्मचाऱ्यातच सुधारणा होणे गरजेचे आहे. असे झाले तर मशीनचा उपयोग होईन, अन्यथा ती ग्राहकांना तापदायक ठरते. असाच प्रकार स्टेट बँकेत घडत असल्याने रांगच बरी होती, अशा प्रतिक्रीया ग्राहक व्यक्त करतात. रांगेपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकांमध्ये ‘ग्रीन चॅनल काऊंटर’ सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएमव्दारेच व्यवहार करायचे आहे; पण सदर मशीन दोन महिन्यांपासून बंद असल्याचे सांगण्यात येते. ती दुरूस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारंजा शहरात दोन एटीएम मशीन आहे. यातील एक बँक आॅफ इंडिया तर दुसरे स्टेट बँकेचे आहे. हे दोन्ही एटीएम आळीपाळीने बंद असतात. यामुळे ग्राहकांना भटकंतीच करावी लागते. शहरात बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. सदर शाखेचे एटीएम नाही. शिवाय बँकेत सुविधाही नाहीत. येथील शाखा व्यवस्थापकाच्या हेकेखोरीमुळे नागरिक त्रस्त आहेत. ही शाखा वरच्या मजल्यावर असल्याने नागरिकांना चढ-उतर करताना त्रास सहन करावा लागतो. जेष्ठ नागरिक वा अपंगांना तर या शाखेचे व्दारच बंद झाल्याची स्थिती आहे. शहरात यापेक्षा इतर चांगल्या व जमीनस्तरावर इमारती उपलब्ध असताना उंचावर जाण्याचे कारण काय, हे कळण्यास मार्ग नाही. प्रारंभी ही शाखा खालच्या मजल्यावर होती, ती आता स्थानांतरीत करण्यात आली. बँकांतील या प्रकाराने ग्राहक संतप्त असून सुविधा पुरविणे गरजेचे झाले आहे.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वानवा
By admin | Published: September 26, 2016 2:16 AM