सहायक शिक्षकाचे आंदोलन : न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतरही फरफट सुरूचवर्धा : न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही. यामुळे कृषक विद्यालयातील पंजाब शेंडे या सहायक शिक्षकाने परिवारासह शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर १६ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्वासन व पोलिसांत तक्रार देत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. या घटनेस १५ दिवस लोटले असताना त्यांना कामावर घेतले नाही. यामुळे शेंडे यांनी पुन्हा मंगळवारपासून जि.प. समोर परिवारासह उपोषणास सुरुवात केली आहे.स्थानिक कृषक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत पंजाब जगन्नाथ शेंडे यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी जि.प. च्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार केली. यात नोकरीची मान्यता रद्द करीत फौजदारी कारवाई करण्यात आली. शिवाय शेंडे यांची शिक्षक पदाची मान्यता रद्द करा, अन्यथा तुमच्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा दबावही संस्था चालकावर आणला. परिणामी, सदर शिक्षकाला नोकरीपासून वंचित व्हावे लागले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना शेंडे यांच्या विरूद्ध पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्रे न्यायालयात सादर करता आली नाही. परिणामी, न्यायालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभारावरच ताशेरे ओढत शेंडे यांच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल दिला. या निर्णयाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण अद्याप शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांना रूजू करून घेण्याचे आदेश दिले नाही. यामुळे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.निर्दोषत्व सिध्द होऊनही टाळाटाळवर्धा : कामावर पूर्ववत रुजू करून घेण्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंती केली. कार्यालयात चकरा मारल्या, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. न्यायालयातून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होऊनही नोकरी न मिळाल्याने शेंडे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जि. प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर चकरा मारून थकलेल्या शेंडे यांनी परिवारासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. यावर शिक्षण विभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी शेंडे आपल्या कुटुंबियांसह शिक्षण विभागासमोर उपोषणाला बसले. त्यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आश्वासन देत लवकर कामावर पूर्ववत रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले. तरीही शेंडे कुटुंबीय आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी ठाणेदार मगर यांच्या दबावाने आंदोलन मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप शेंडे यांनी केला. त्यालाही आता पंधरा दिवस लोटले असून अद्याप कामावर रुजू करण्याची कुठलीही कारवाई न केल्याने सोमवारपासून पुन्हा शेंडे परिवाराने जि. प. समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.(शहर प्रतिनिधी)
न्यायासाठी सहपरिवार बेमुदत उपोषण
By admin | Published: December 03, 2015 2:26 AM