वर्धा : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. त्याच पार्श्वभूमीवर बनावट दारूचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी येताच सावंगी परिसरात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखानाच उद्ध्वस्त करून लाखो रुपयांचा बनावट दारूचा साठा पकडला होता. या घटनेला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना सावंगी पोलिसांनी पुन्हा नागठाणा परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीचा अड्डा हुडकावून लावला.
पोलिसांनी गोवा मेड दारूच्या बाटल्या व सील तसेच विदेशी कंपन्यांचे स्टिकर असा ८ हजार ५७० रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली तर एक आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई ४ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. स्वप्निल रेवतकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर आकाश भोयर रा. वर्धा असे फरार आरोपीचे नाव असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, नागठाणा परिसरातील व्यंकटेश नगरी येथे असलेल्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये बनावट दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या विविध पथकांनी घटनास्थळी जात छापा मारला असता काही आरोपींनी पळ काढला. अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये गोवा व्हिस्की कंपनीच्या १२ विदेशी बाटल्या, विविध देशी-विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या तसेच विविध कंपन्यांचे लेबलचे स्टिकर, झाकणं, प्लास्टिकच्या सील लेबलच्या १७ लडा, सील करण्यासाठी वापरण्यात येणारा कंगवा, बनावट विदेशी दारू तयार करण्यास वापरलेले साहित्य व विदेशी दारूचा साठा असा एकूण ८,७५० रुपयांचा बनावट दारूचा साठा सावंगी पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी आरोपी स्वप्निल रेवतकर यास पोलिसांनी अटक केली, तर एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गांजासह शस्त्रही जप्त
सावंगी पोलिसांनी फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारू निर्मिती अड्ड्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी चाकू तसेच गांजा मिळून आला. दोन स्टीलचे पाते असलेले चाकू आणि ७४ ग्रॅम गांजाही जप्त केला.
'योगेश' करायचा सावंगीतील डॉक्टरांना दारू 'सप्लाय'
स्थानिक गुन्हे शाखा तसेच सावंगी पोलिसांनी सावंगी ग्रा.पं. परिसरातील रहिवासी योगेश पेटकर याच्या निवासस्थानी छापा मारला असता आरोपी अमर रामटेके हा देशी विदेशी दारू बाळगून मिळून आला. पोलिसांनी योगेश पेटकर याच्या निवासस्थानाहून महागड्या नामांकित कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. आरोपी दारुविक्रेते हे सावंगी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या विद्यार्थ्यांना दारु विकत असल्याचे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू असून विद्यार्थी आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.