लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास नागपूर येथे हलविण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा पुरविण्यास नकार दिल्याने देवानंद कनेरी या शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारने केला आहे.रसुलाबाद येथील शेतकरी देवानंद रामभाऊ कनेरी (५०) हे शनिवारी सकाळी शेतात काम करीत असताना भोवळ येवून पडले. त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना प्रहार संस्थेच्या रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली व त्यांच्या डोक्याची रक्तवाहिनी फाटल्याने त्यांना नागपूर येथे हलवावे लागेल असे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते राजेश सावरकर यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त सरकारी रुग्णालयातच सुविधा पुरवितो, खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी सुविधा देता येणार नाही, असे सांगून १०८ रुग्णवाहिका सेवा देण्यास नकार दिला. दोन तास हा सर्व घटनाक्रम चालला.त्यानंतर सावंगी रुग्णालयाचे प्रमुख उदय मेघे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व रात्री ११ वाजताच्या सुमारास रुग्णाला नागपूर येथे हलवावे लागले. परंतु या सर्व कालावधीत रुग्णाची प्रकृती खालावली व रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया राजेश सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१०८ केवळ शासकीय रुग्णालयाकरिता अपघातात रुग्णाला आकस्मिक सेवा देण्याकरिता १०८ ही रुग्णवाहिका शासनाच्यावतीने कार्यान्वीत करण्यात आली आहे. याची जबाबदारी एक विशिष्ट विभाग सांभाळत आहेत. केवळ आकस्मिक सेवेकरिता ही रूग्णवाहिका असून नागरिकांकडून तिचा वापर छोट्या छोट्या कामांकरिता करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.