टोळी सक्रिय : लुबाडणुकीचा नवा फंडासमुद्रपूर : टॉवर उभारणीसाठी जमीन पाहिजे, अशी प्रसिद्ध देऊन वेगवेगळ्या प्रलोभनांच्या आधारे तालुक्यातील लाहोरी येथील शेतकरी महिलेची ९५ हजारांनी फसवणूक झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. लुबाडणुकीच्या या नव्या फंड्याने साऱ्यांनाच अचंबित केले असून भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना फसवणारी टोळीच सक्रिय असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. नवी दिल्ली येथील ग्लॅक्सो हायटेक टॉवर कंपनीने टॉवर उभारणीकरिता जमीन पाहिजे, असे आवाहन केले होते. त्यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक ही देण्यात आले होते. या आधारे लाहोरी येथील भावना मारोतराव ढाकरे यांच्या वाचनात आली. यावरून त्यांनी संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने मोहनकुमार वर्मा, दिल्ली असा परिचय दिला. वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क झाल्यावर टॉवर उभारणीकरिता ढाकरे यांच्या जमिनीची निवड झाल्याची माहिती त्याने दिली. जमिनीच्या मोबदल्यात ४० लाख रुपये देण्याचे त्याने आमिष दिले. यासाठी पहिले ९५ हजार रुपये विशिष्ट बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. भावना ढाकरे यांनी लगेच ९५ हजार ४०० रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर जाहिरातीतील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून पाहिले असता तो बंद दाखवित होता. काहीवेळेस संपर्क होऊनही समोरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ढाकरे यांच्या लक्षात आले. यावरून शुक्रवारी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी भादंविच्या ४२०, ८ (डब्ल्यू), ६६(३)(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(तालुका प्रतिनिधी)
टॉवर उभारणीच्या नावावर शेतकरी महिलेची फसवणूक
By admin | Published: June 07, 2015 2:27 AM