शासकीय कर्मचाऱ्यांची मुख्यालयी दांडी विरूळ (आकाजी) : आर्वी कृषी विभागांतर्गत गावोगावी असलेले कृषी सहायक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. अनेक कृषी सहायक आर्वी, वर्धा येथून मुख्यालयी ये-जा करतात. यामुळे ते गावात कधी येतात व कधी जातात, हे शेतकऱ्यांना माहितीच होत नाही. त्यांचा नेमका दिवस कोणता, हे माहिती नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. कृषी सहायकांनी ठराविक दोन दिवस प्रत्येक गावी ग्रा.पं. मध्ये बसून शेतकऱ्यांची कामे करून योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परिसरातील काही कृषी सहायक विरूळच्या विकास फार्ममधून कारभार सांभाळतात. विकास फार्म गावापासून एक-दीड किमी अंतरावर असल्याने योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. रसुलाबादच्या कृषी सहायकाने १६० शेतकऱ्यांना सोयाबीन थैल्यांचे वाटप केले. यात शेतकऱ्यांकडून प्रती बॅग ९८० रुपये घेण्यात आले; पण काही दिवसांनी शेतकऱ्यांचे पैसे परत करून मोफत वाटप केले. याबाबत कृषी सहायक केंद्रे यांना विचारले असता शेतकऱ्यांकडून सोयाबीन थैल्यांचे पैसे घेण्यात आले; पण नंतर शासन परिपत्रक आल्याने मोफत वाटप करून पैसे परत केले. यातील नेमका गोंधळ काय, हे शेतकऱ्यांना कळले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित
By admin | Published: July 18, 2016 12:39 AM