लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जात असतानाच त्याच नावाने बनावट वेबसाईट तयार करून शेतकऱ्यांना गंडा घालणारे सायबर भामटे सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलमध्ये तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचे सौर देण्यात येत आहे. या योजनेची पीएम शब्द खोडून फक्त ‘कुसुम योजना’ नाव देऊन लिंक व्हायरल केली आहे. व्हॉट्सॲपवर व्हायरल करून त्यात शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती घेऊन आपणांस योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगितले जाते. प्रथम ५६०० रुपये भरून घेतले जात आहे. नंतर शेतकऱ्यांना फोन करून १६ हजार २०० रुपये भरण्यासाठी सांगितले जात आहे. या बनावट लिंकद्वारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी या बनावट वेबसाईटला बळी पडत असून, लाखो रुपयांनी त्यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सावध राहून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुगलवर सर्च करून करतात ‘फ्राॅड’सायबर भामट्यांनी पीएम कुसुम योजनेची बनावट वेबसाईट तयार केली आहे. गुगलवरून शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन हे भामटे बनावट वेबसाईटची लिंक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवित आहेत. लिंक खरी समजून शेतकरी या फसवणुकीला बळी पडून लाखो रुपयांनी त्यांची फसवणूक केली जात आहे.
केस स्टडी १
अजनगावच्या शेतकऱ्याची १८ हजारांनी फसगत आर्वी तालुक्यातील अजनगाव येथील एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर ‘कुसुम’ योजनेची बनावट लिंक आली. त्या शेतकऱ्याने लिंक ओपन केली असता, माहिती घेण्याच्या बहाण्याने त्याच्या बँक खात्यातून परस्पररीत्या १८ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून त्यांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार त्यांनी सायबर सेलकडे दिली.
केस स्टडी २
वृद्ध शेतकऱ्याला १८ हजारांचा गंडा समुद्रपूर तालुक्यातीलच एका वृद्ध शेतकऱ्याच्या मोबाईलवर कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटवरून लिंक आली. शेतकऱ्याला सौर पंप मिळणार असल्याने त्यांनीही त्यावर विश्वास ठेवला. आधी ५६०० रुपये भरण्यास सांगितले, त्यानंतर त्यांच्याकडून २८ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली.
केस स्टडी ३
२.५० लाखांनी शेतकऱ्यास गंडविलेकारंजा घाडगे येथील शेतकऱ्याच्या मोबाईलवर कुसुम योजनेबाबत बनावट लिंक आली. शेतकऱ्याने लिंक ओपन केली असता, आपल्या फायद्याची असल्याचे लक्षात येताच त्यांनी भामट्याने मागितलेली माहिती दिली. मात्र, टप्प्याटप्प्याने पैशाची मागणी करीत तब्बल २ लाख ५० हजार रुपयांनी शेतकऱ्याला गंडविल्याने त्याने तक्रार दिली.
शेतकऱ्यांनो फसवणूक होत आहे, सावध राहा
पीएम कुसुम योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब आता उजेडात येत आहे. बनावट वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशनच्या अर्जांद्वारे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. वेबसाईटवर शेतकऱ्यांना नोंदणी शुल्क ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे. बनावट वेबसाईट ही हुबेहूब खऱ्या वेबसाईटसारखीच असून, तत्सम डोमेन बनवून त्यात किरकोळ बदल करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे. - संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.