महिलांचा पुढाकार : आरोग्याला पोषकवर्धा : कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो. मानवी आरोग्याला घातक ठरणारी ही पीकपद्धती नाकारुन आलोडी येथील सुनीता उमाकांत डुकरे यांनी केवळ सेंद्रीय खत वापरून भाजीपाला शेती केली. त्यामुळे आरोग्याला पोषक ठरणारा भाजीपाला खरेदी करण्यास शहरासोबतच आता ग्रामीण भागातील नागरिक पसंती देत आहेत. आलोडी हे गाव वर्धा शहराला लागून असल्याने आता दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. एका अर्थाने या परिसराला शहराचेच स्वरुप आल्याचे दिसून येते. मात्र घराच्या मोकळ्या जागेत भाजीपाल्याची शेती करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. या पार्श्वभूमिवर सुनीता डुकरे यांनी ३ हजार ४०० चौरस फुटाच्या जागेत भाजीपाल्याची सेंद्रीय शेती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. महादेव डुकरे यांच्या मालकीचे पांढऱ्या मातीचे एक जुने घर आलोडी परिसरात होते. काही वर्षापूवी त्यांचे निधन झाले. पांढऱ्या मातीत भाजीपाला पिकविणे म्हणजे अग्निदिव्यच आहे, परंतु सुनीता डुकरे यांनी याच जागेवर सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सेंद्रीय शेतीची शास्त्रीय माहिती घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. त्यांच्या शेतीत आता कारले, वांगी, मिरची, टमाटर, चवळी, वालाच्या शेंगा, दोडके, गवार, भेंडी, पालक, कोथिंबीर, तूर आदी पिके घेतली जात आहेत. रासायनिक खतांचा अजिबात वापर होत नाही. त्यामुळे अनेकांनी डुकरे यांच्या शेतातूनच भाजीपाला विकत घेण्यास प्राधान्य दिले आहे. यातून आर्थिक मिळकत होऊ लागली. ग्राहकांनी मागणी केल्यास कोणत्याही वेळी थेट शेतातूनच भाजीपाला उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे ग्राहकांतून याला मागणी वाढत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
आलोडी येथे सेंद्रीय खतातून फुलविली भाजीपाल्याची शेती
By admin | Published: September 03, 2016 12:13 AM