लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शेतकऱ्याचे नगदी पीक असलेल्या कापसाची शासकीय स्तरावर सीसीआय व कापूस पणन महासंघ यांच्याकडून होणारी खरेदी लांबल्याने सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्याने कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
राज्यात उत्पादित होणारा ७७ टक्के कापूस एकट्या विदर्भात पिकतो. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. दसऱ्यानंतर कापूस निघण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) व राज्य सरकारचे कापूस पणन महासंघ यांनी विदर्भात खरेदी सुरू केलेली नाही. यांचे केंद्र निश्चित झाले असून खरेदी दिवाळीनंतर सुरू होणार आहे. यंदा कीड व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे अनेक शेतकरी आता निघालेला कापूस विकण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, वणी, वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आर्वी आदी ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे कापसाला ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल भाव दिला जात आहे. केंद्र सरकारने यंदा कापसाला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, केंद्र सुरू केेले नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकताना क्विंटलमागे थेट १ हजार ते १ हजार २०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
आर्द्रतेच्या मुद्यामुळे सीसीआयची खरेदी लांबलीविदर्भात सीसीआय मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करते. अकोला येथून सीसीआयचा सर्व कारभार चालविला जातो. मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाल्याने कापसातील आर्द्रतेचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे, असे कारण देत सीसीआयने दसऱ्यानंतर सुरू होणारी कापूस खरेदी लांबणीवर टाकली आहे. यापूर्वीच सीसीआयने खरेदी केंद्राची निविदा प्रक्रीया पूर्ण केली आहे. अनेक बाजार समित्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण केली आहे. सीसीआय १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा कापूस खरेदी करते. त्यामुळेच ते १२ टक्के आर्द्रता येण्याची प्रतीक्षा करीत असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे.