विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा सतावत आहे.
आता दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले खरे पण सततच्या पावसाने तेही काळवंडले व बारीक झाले आहे. यामुळे उताराही चांगलाच घटला असून हल्ली प्रति एकर २ ते ३ क्विंटलचा उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत"यावर्षी अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरिपातील उभ्या पिकांची पुरती वाट लागली. यातून बचावलेले पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून खर्च केला. पण आताही सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन घरी येते की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आता दिवाळी साजरी कशी करावी, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे." - मनीष येणकर, शेतकरी
"पावसाच्या तावडीतून कसेबसे सोयाबीनची मळणी केली व उत्पादन घरी आणले. पण यामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने याला वाळविण्यासाठी नाकात दम आला आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सोयाबीन विक्री योग्य होते की नाही. याची शास्वती नाही. उत्पादनातही घट आल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - प्रवीण भोयर, शेतकरी
"अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात ओलावा आहेत, हे जरी सत्य असले तरी पण सोयाबीनचे भाव आधीच घसरले होते हेही तितकेच खरे आहे. तसेही शेतमालाच्या दरात चढ-उतार सुरूच असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्या प्रमाणात आवक नाही."- विक्की उमरे, व्यापारी
व्यापारी काय म्हणतात... "सोयाबीनचे दर आता जरी घसरले असेल तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकावे. पूर्ण माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरू शकतील. शेतकऱ्यांनी बाजारांचाही अंदाज घ्यावा."- प्रमोद ठाकरे, व्यापारी