वर्धा : आंजी-बोरखेडी धरणाचे काम कधीच पूर्ण झाले. मात्र याभागात आवागमनाकरिता रस्ता बनविण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडला आहे. गत २५ वर्षांपासून या भागात राहणारे ग्रामस्थ या अडचणीला तोंड देत आहे. ये-जा करायला रस्ता नसल्याने शेतकरी सर्वाधिक प्रभावित होत असून शेतकऱ्यांना लांबच्या रस्त्याने शेतात जावे लागते. प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे कच्च्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. अखेर त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन समस्येकडे लक्ष वेधले आहे.गत २५ वर्र्षांपासून बोरखेडी प्रकल्पाचे काम सुरु होते. हे काम पूर्णत्वास आले, परंतु त्या धरणाकडे जाण्याकरिता अजून साधा रस्ताही पाटबंधारे विभागाने तयार केला नाही. याच मार्गाने गावातील शेतकरी शेतात जातात. धरणातील बॅकवॉटरमुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. शेतात ये-जा करणे शक्य नसल्यामुळे श्वापदे पिकांची नासाडी करतात. शेतकऱ्यांना बराच फेरा मारुन जातात. सात वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गावातील रस्त्याचा सर्वे केला. मात्र त्यानंतर कार्यवाही शून्य आहे. गावकऱ्यांनी २००७ ला वर्धा पाटबंधारे विभागाला पत्र दिले. परंतु अद्याप रस्ता तयार करण्यात आला नाही. हे धरण सोसायटीकडे हस्तांतरीत करण्यात आले. यानंतर समस्यांत वाढ झाली आहे. याची संबंधित विभागाकडून चौकशी करण्याची मागणी आहे. सोसायटीचे पदाधिकारी कोणत्याच समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे दोन्ही गावतील शेतकरी पदाधिकारी यांच्या नावाने बोंब मारतात. धरणाच्या कालवा दुरुस्तीत भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार आहे. याची चौकशी केली जावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासह अनियममित पाणी सोडले जाते. गेट क्र. ३ चे पाणी गेट उंच करुन कमी केले. तसेच क्रमांक ९ च्या गेट मधून अधिक उपसा केला जातो. याचा ठराविक लोकांना लाभ होतो. कालवा मार्गावरील काट्या तोडण्याचे कंत्राट दिले होते. त्यातही आर्थिक अपहार केला आहे. नानाप्रकारे बिले काढल्याची चर्चा आहे. या मार्गावरील बोरीचे झाड तसेच आहे. यामुळे या मार्गाने जाणे शक्य नाही. हीे बोरीचे झाडे हटविण्याकरिता जास्त खर्च येत नाही. मात्र यातही अधिकचे बिले लावण्यात येतात. या सोसायटीची वर्षभरात एकही सभा झाली नाही. यामुळे गावातील लोकांना कामकाजाची कोणतीच माहिती नसते. पाटबंधारे विभाग निवडणूक न घेता पदावरील अध्यक्षाला कायम ठेवतात. तातडीने येथे निवडणूक नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याची मागणी आहे. दोन्ही गावातील नागरिकांना सोयीस्कर ठरेल असा धरणापर्यंत रस्ता तयार करावा. किमान रस्त्याचे खडीकरण करुन पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. याची कोणतीच कार्यवाही झाली नाही तर ग्रामस्थ याविरोधात आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची पायपीट
By admin | Published: October 01, 2014 11:28 PM