सिंदी कृऊबा समितीतील प्रकरण : सचिवावर कारवाईची मागणी वर्धा : शेतकऱ्यांच्या कापसाची रक्कम घेवून पसार झालेला सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचा संचालक सुनील टालाटुले याचे प्रकरण मुंबईत पोहोचले. दिल्ली व नागपुरात आंदोलन झाले. असे असताना या समितीचा सचीव गुन्हे दाखल असतानाही समितीत कार्यरत आहे. शिवाय त्याच्या वैयक्तीक प्रकरणात तो बाजार समितीची रक्कम वापरत आहे, असे अनेक आरोप करीत अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने शनिवारी येथील जिल्हा उपनिंबधक कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजारपेठ सेलू येथे ४०० शेतकऱ्यांची कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने फसवणूक केली. त्यासंदर्भात सेलू पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार टालाटुले व प्रशासक तलमले आणि सचिव आय.आय.सुफीवर भादंविच्या कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे उपनिबंधक कार्यालयातर्फे लवाद या न्यायाधिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून सुनील टालाटुले आणि सुुफी या दोेघांच्याही संगणमताने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निकालात स्पष्ट झाले. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. भारतीय दंड विधान ४२० मध्ये सात दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर सुद्धा सचिवावर निलंबनाची कारवार्ई झालेली नाही. उपनिबंधक कार्यालयाकडूनही यात कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी घेराव घालताना केला. सचिवावर कारवाई संदर्भात समितीला कळवू - ए.बी. कडूशेतकरी प्रतिनिधी निवेदन घेवून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजार समितीचे सचिव त्याच्या वैयक्तीक न्यायालयीन प्रकरणात समितीची रक्कम वापरत आहे. या बाबत चौकशी करण्यात येईल. तसेच गुन्हा दाखल असताना अटक करण्यात आलेला समितीचा सचीव पुन्हा कार्यरत होत असल्याचा आरोपही आहे. याही बाबात चौकशी करण्यात येईल. मुंबई येथील बैठकीत झालेले निर्णय अद्याप कळविण्यात आलेले नाही. येत्या दिवसात ते कार्यालयाला प्राप्त होतील. त्यात दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाहीची दिशा ठरविण्यात येईल. बाजार समितीचे अंकेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर कलम ४० अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना बाजार समितीला देण्यात येईल. शासनाने या प्रकरणात आरोपीची संपत्ती लिलावात काढण्याच्या सूचना केल्या आहेत. ही कारवाई झाल्यास शेतकऱ्यांना त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वळती करण्याची कार्यवाही होवू शकते, असे उपनिबंधक ए.बी. कडू म्हणाले. शासनाचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - अविनाश काकडेसिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात आरोपीला पाठीशी घालण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. यात भाजपाच्यावतीने अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात येत आहे. एक कर्मचारी आठ दिवस कारागृहात राहून बाहेर आल्यावर पुन्हा त्या खुर्चीवर बसून न्यायाधीशाचे काम करतो, असे होवू शकते काय. या बाबत उपनिबंधकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून नियमाची पाहणी करण्याचे बोलले जाते. यातूनच सदर प्रकार दडपण्याचा शासनाचा प्रयत्न उघड होत असल्याचे अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे यावेळी म्हणाले.
उपनिबंधकांना शेतकऱ्यांचा घेराव
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM