कारंजा (घा.) (वर्धा) : जनावरांसाठी चारा आणण्याकरिता शेतात जात असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात तो जागीच ठार झाला. धानोली-येणीदोडका शेतशिवारात सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विठ्ठल वडुले (६०), रा. धानोली असे मृत शेतक-याचे नाव आहे.नेहमीप्रमाणे विठ्ठल वडुले स्वमालकीच्या शेतात जनावरांकरिता चारा आणण्यासाठी गेले होते. बराच काळ लोटूनही वडील घरी परतले नाही म्हणून मुलगा शेषवाव वडुले हा शेतात पाहण्याकरिता गेला असता त्याला वडिलाचा मृतदेह व शेजारी विळा, दोरी आढळून आली. घटनेची माहिती मुलाने गावात दिल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कारंजा व हिंगणी येथील वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान त्यांना शेतक-यांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागले. ठोस आश्वासनाशिवाय ग्रामस्थांनी मृतदेहाचा पंचनामा करण्यास नकार दिला. मृत विठ्ठलराव यांची जंगलव्याप्त भागात तीन एकर शेती आहे. त्यामुळे वन्यजीवांची कायम भीती असते. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतक-यांमोर उभा ठाकलेला असतो. या हल्ल्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.धानोली हे गाव कारंजा तालुक्यात असले तरी ते हिंगणी वनपरिक्षेत्रातील बोर व्याघ्रप्रकल्पात येते. या परिसरात १ वाघ व १ वाघीण असून मृतावर पिंकी नामक वाघिणीने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. ज्या परिसरात हल्ला केला, ते ठिकाण धानोलीपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. मृताच्या परिवारातील तीन व्यक्ती वनविभागात वनमजूर म्हणून काम करतात.----------------शासनाच्या नियमाप्रमाणे वन्यजीवाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयाला ८ लाख रुपयांपर्यंत मदत देता येते. शासनाची तरतूद असल्याने वाढवितादेखील येते.- जी. एस. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, बोरधरण
कारंजात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, धानोली-येणीदोडका शेतशिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 6:11 PM