कृषिमित्रांचे दोन दिवस आमरण उपोषण : आश्वासनानंतर आंदोलन मागेआष्टी (श.) : कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत कृषिमित्रांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे २५ मे पासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनापूढे कृषी विभागाने नमते घेत कृषिमित्रांना आश्वासन दिले. यामुळे बुधवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. तालुक्यात ४८ कृषिमित्र कार्यरत आहे. गत ६ वर्षांपासून हे कृषिमित्र शेतकरी, कृषिसहायक यांच्याशी निगडीत कामे करतात. कृषिमित्रांना मानधन दिले जात नाही. गत अनेक वर्षांपासून कर्तव्यसुची, ओळखपत्र, सन्मानाची वागणूक दिली नाही. साहित्यही वितरित केले नाही. यामुळे शासनाच्या योजना राबवूनही सातत्याने कृषिमित्रांना त्रास दिला जात आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कृषिमित्र युवा कामगार संघटना स्थापन करून अध्यक्ष आशीष वाघ, सचिव राहुल पडोळे यांनी कृषी विभागासमोर उपोषण सुरू केले. उपोषणाला उपविभागीय कृषी अधिकारी अरुणा बलसोगे, तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांनी कृषिमित्रांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर चर्चा केली. यात प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून २ जून रोजी प्रकल्प संचालकाच्या कार्यालयात संयुक्त चर्चा करण्याकरिता पाचारण करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या चार प्रतिनिधींनी चर्चेला येण्याचे कळविले आहे. लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आशीष वाघ, राहुल पडोळे, सुरेंद्र नागपुरे, प्रफुल्ल डहाके यांना निंबूपाणी देत उपोषणाची सांगता करण्यात आली. भाजपाचे तालुका सरचिटणीस गजानन भोरे, अजय लोखंडे यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.(प्रतिनिधी)मानधन, कर्तव्यसूची व ओळखपत्रांपासूनही वंचितआष्टी तालुक्यात ४८ कृषिमित्र सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना मानधन देण्यात येत नाही. शिवाय कर्तव्यसुची नाही, ओळखपत्रही नाही आणि सन्मानाची वागणुकही नाही. यामुळे ते त्रस्त झाले आहे. कृषी सहायकांना गावात मदत करणारे हे कृषिमित्र साहित्यापासूनही वंचितच होते. यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. याची दखल घेत चर्चेस बोलविण्यात आले.
उपोषणाच्या हत्यारापुढे नमला कृषी विभाग
By admin | Published: May 30, 2015 12:12 AM