लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसान भरपाईकरिता तळेगाव ते धोत्रा रस्त्यावर गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी वाहतूक करणारे टिप्पर दिवसभर रोखून धरण्यात आले. अखेर नायब तहसिलदार जाधव यांनी मौका चौकशी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.सोनेगाव ते ऐकुर्ली हा शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता आहे. याच रस्त्यावर कंत्राटदार कंपनीने मुरुम व दगडाकरिता शेत विकत घेतले आहे. या शेतातून पादणरस्त्याने मुरुमाची रात्र-दिवस वाहतूक सुरु आहे. या वाहतूकीमुळे उडणारी धुळ शेतातील गहू, चना, कापूस व तुरीवर गोळा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. म्हणून या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याकरिता जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अखिल मानवाधिकार आॅर्गनाईझेशनचे जिल्हा अध्यक्ष रवि तडस, सरपंच अतुल तिमांडे, माजी जि.प.सदस्य प्रमोद वरके यांच्यासह नागरिक व शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तलाठी व नायब तहसीलदारांनी मौका चौकशीकरुन पंचनामा केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता रस्ता मोकळा करण्यात आला.नायब तहसीलदारांनी मौका चौकशी पंचनामा केला. उत्खनाचे आदेश पाहिले. टी.पी. तपासल्या, मौका चौकशीत शेतकऱ्याची नोंद केली. हा पंचनामा शुक्रवारी तहसिलदारांकडे सादर करण्यात येणार आहे.- मधुकर गेडाम, तलाठी, तळेगाव (टा.)पांदण रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अतुल तिमांडे, सरपंच, तळेगाव (टा.)
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:31 PM
वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.
ठळक मुद्देवाहतुकीमुळे पीके धोक्यात : नायब तहसीलदारांकडून मौका चौकशी