बाजार समितीकडून कर्जाकरिता चार कोटी रुपयांची व्यवस्था हिंगणघाट : शेतमाल काढण्याचा हंगाम येताच बाजारात शेतमालाच्या किंमती पडतात. यामुळे शेतकरी त्यांच्याकडील उत्पादन व्यापाऱ्यांना कमी दरात देत असतात. यात शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हाणी सहन करावी लागते. याच शेतमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालाची किंमत वाढलेली असते. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सुरू असलेल्या तारण योजनेचा लाभ घ्यावा असे समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठरी यांनी कळविले आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या दृष्टीने समितीमार्फत ४ कोटी रुपयांच्या तारण कर्ज प्रस्ताव कृषी पणन मंडळास सादर केला आहे. या योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे कळविले आहे. यावेळी संचालकांची उपस्थिती होती.समितीमार्फत गत १५-२० वर्षांपासून सोयाबीन, तूर, चना, गहू व हळद या शेतमालाकरिता तारण योजना राबविली जाते. सदर योजना कृषी पणन मंडळाच्या शर्थी व अटीस अधीन राहून बाजार समितीमार्फत राबविण्यात येत आहे. दिवसाचे बाजार भाव विचारात घेत तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेली किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येईल. या योजनेंतर्गत दिलेल्या कर्जाचा भरणा १८० दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. समितीच्या गोदामात फक्त सोयाबीन व शेतमालाची साठवणूक केल्या जाते. यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी शेतीमालाचा काढणी हंगामात मिळेल त्या भावात शेतमाल विकण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साफसफाई करून साठवणूक करावी.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा
By admin | Published: September 14, 2015 2:10 AM