वडनेर : शेती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याने गावातील शेतकरी संघटित होऊन नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करू शकणार नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येते. मात्र शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या वर्तमान शेतकरी उत्पादक कंपनीने प्रोत्साहन दिल्यामुळे तब्बल १ हजार ५७५ शेतकऱ्यांनी मतभेद विसरून चक्क सामुहिकरित्या कृषी सेवा केंद्र उभारण्याचा संकल्प पूर्ण केला. ही बाब प्रेरणा देणारी ठरत आहे.तालुक्यातील दारोडा येथे या अनोख्या कृषी केंद्राला सुरूवात करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना माफक दरात विविध कृषी उपयोगी वस्तू उपलब्ध करुन दिल्या आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला हिंगणघाट येथील उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय साखरे, विकास गंगा संस्थेचे संचालक रंजित बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील १ हजार ५७५ शेतकऱ्यांनी संघटित होऊन वर्तमान शेतकरी उत्पादक यांनी नोंदणी करुन हा उपक्रम सुरू केला आहे. या केंद्रातून प्रत्येक तालुक्यामध्ये आठवडी बाजार सुरू करण्यात येणार आहे. शेतातून थेट भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. पणन महामंडळातर्फे याची दखल घेत आवश्यक यंत्र देण्यात आले. मिरची, हळद पावडर, आलू चिप्स व टमाटर केचप आदी पदार्थाची निर्मिती करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. याशिवाय खत, औषधी, बियाण्यांचा पुरवठा, सौर कुंपण, तुषार व ठिबक सिंचन विक्रीची सेवाही माफक दरात सुरू करण्यात येईल, अशी माहिती संचालक भोजराज तिमांडे यांनी दिली. उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे म्हणाले, शेतकऱ्यांनी संघटित होऊन विधायक पाऊल उचलले आहे. यातून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल. संजय साखरे यांनी भाजीपाला लागवड व विक्रीबाबत सविस्तर माहिती दिली. रणजित बोबडे यांनी शेतमालाची प्रक्रिया, विपणन व त्यातील विविध पैलूंची सखोल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अमित गाडबैल यांनी केले तर आभार मनीष सेलकर यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)
मतभेद विसरुन शेतकऱ्यांनी सुरू केले कृषी सेवा केंद्र
By admin | Published: June 03, 2015 2:21 AM