वर्धा : जिवंत विद्युत तार तोंडात घेऊन पढेगाव येथील गणेश श्रावण माडेकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शेजारील वर्धा जिल्ह्यात घडली असून, ही बाब राज्यातील 'शिंदे-फडणवीस' सरकारसाठी लाजिरवाणी आहे, असे खडे बोल 'लोकमत'च्या बातमीचा हवाला देत सुनावले.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी हवालदील झाला. त्याला सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. वर्धा तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी गणेश श्रावण माडेकर यांच्या साडेसहा एकर शेतातील अंकुरलेले संपूर्ण पीक भदाडी नदीच्या पुरात खरडून गेले. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. केंद्रीय पथक असो वा विविध राजकीय पक्षाचे बडे पुढारी यांनी वर्धा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. पण प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कुठलीही शासकीय मदत जाहीर करण्यात आली नाही. याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
पावसाची माहिती देणे अचानकपणे बंद
पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करत असतात. मात्र, १५ जुलै २०२२ पासून राज्य शासनाने सरकारी संकेतस्थळावर पावसाची माहिती देणे अचानकपणे बंद करण्यात आले. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. त्यावर हा मुद्दा तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
'लोकमत'ने घेतली ठळकपणे दखल
- शासकीय मदतीची अपेक्षा असलेल्या आणि मनोधैर्य खचलेल्या शेतकरी गणेश यांनी १८ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास राहत्या घरी जिवंत विद्युत तार तोंडात धरली.
- ही बाब लक्षात येताच त्यांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी गणेश यांना मृत घोषित केले.
- १९ रोजी गणेश यांच्यावर अंत्यविधी झाल्यावर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
- प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकमतने २१ रोजी वृत्त प्रकाशित केले. याच बातमीचा हवाला देत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी थेट राज्यातील 'शिंदे-फडणवीस' सरकारला धारेवर धरत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी रेटली. सायंकाळी सरकारने मदतीचा जीआर जारी केला.