घोराड : खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली. अशात व्यापाऱ्यांकडून दर वर्षी होणारी लूट कायम राहणार वा यंदाही हमी भावावरच समाधान मानावे लागणार अशी चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडली आहे.विजय दशमीला दरवर्षी होणारा कापूस खरेदीचा शुभारंभ यावर्षी टळला. हा शुभारंभ उशिरा होणाऱ्या कापूस वेचणीमुळे लांबला असला तरी शासनाच्या हमीभावावर व्यापारी जास्त रक्कम देवून कापूस खरेदी करेल अथवा शेतकऱ्यांच्या हाती हमीभावच येणार अशी चिंता त्याला पडली आहे. शासनाचा हमीभाव ४ हजार ५० रुपये आहे. या भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सुर्याेदय अन् सूर्यास्त शेताच्या बांधावर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे व शेणखतासह रासायनिक खताचा खर्च त्यातच निंदणाचा वाढलेला खर्च, कापूस वेचणी आदी खर्चाचे बजेट पाहता व खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे विलंबाने झालेल्या पेरण्या उत्पन्नात घट आणीत आहे. यामुळे उत्पादन खर्चावर कापसाला भाव मिळाला नाही तर सलग चौथ्या वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल होणार असल्याचे चिन्ह आहे. कापसाला सहा हजारांपेक्षा अधिक भाव यावर्षी मिळाला नाही तर खरीप हंगामातील पांढऱ्या सोन्यापासून शेतकरी दुरावला जाण्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव कापूस उत्पादकांना मिळू नये याकरिता शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुका स्थळावर दिवाळीपुर्वी सुरू करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)
कापसाच्या दरातील मंदीने शेतकरी चिंतेत
By admin | Published: October 08, 2014 11:30 PM