लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहरात सध्या भूमिअंतर्गत पाईपलाईनक रिता खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पक्क्या रस्त्यांची आधीच वाट लागली आहे. त्यातच रस्त्याचे बांधकामही हाती घेण्यात आल्यामुळे या पावसाळ्यात रस्त्यावर जिकडेतिकडे पाण्याचे डबके साचलेले आहे. परिणामी या डबक्यातून वाहने चालवितांना नागरिकांना चागलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे खोदकाम आणि बांधकामात नगरपालिकेकडून कोणतेही नियोजन केले नसल्याने या नियोजना अभावी खड्डेमय रस्त्यावरुन नागरिकांना वाटचाल करावी लागत आहे. मागील आठवड्यापासून येथे पावसाची सुरूवात झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहºयावर आंनद दिसून येतो परंतु, शहरवासीयांची चांगलीच फजिती होत असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे २० दिवस उशिरा आगमन झाले. पावसाळ्यापूर्वी अमृत व मलनिस्सारण योजनेअंतर्गत सुरु असलेले खोदकाम बुजविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, नियोजनाचे तीनतेरा वाजल्याने आणि नगरपरिषद प्रशासनाचा कंत्राटदारावर वचक नसल्याने खोदकामाची माती रस्त्याच्या बाजुने अस्ताव्यस्त पडलेली आहे. आता पावसामुळे रस्त्याच्या बाजुला असलेली माहिती मोठ्या वाहनामुळे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे डांबरी व सिमेट रस्त्यावर सध्या चिखल निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातील रस्त्यांचीही हिच परिस्थिती आहे.केवळ दोन- चार दिवसाच्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दमदार पावसाचे दिवस बाकी आहे. जर दमदार पाऊस झाला तर या रस्त्यांची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दिवसात नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.शहरातील सध्याच्या परिस्थितीने पन्नासवर्षापूर्वीच्या स्थितीची नागरिकांना आठवण करुन दिली आहे.सध्या जे चित्र शहरात निर्माण झाले आहे ते पन्नास वर्षापूर्वीची आठवण करुन देणारे ठरत आहे. पूर्वी मुख्य रस्ते मजबूत असायचे आणि गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असायचे. आता गल्लीबोळातील रस्तेही सिमेंटचे झाले असले तरी पालिकेच्या नियोजनशुन्यतेमुळे चिखलाने माखलेले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणही बळावले आहे.वर्ध्यातही चिखलवर्धा- शहरातही अमृत योजनेंतर्गत सुरुवातील भूमिगत जलवाहिनी आणि त्यानंतर भूमिगत मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे शहरातील मजबूत रस्त्याचे खस्ताहाल झाले. भूमिगत मलवाहिनीकरिता सिमेंटचे रस्ते मधोमध फोडण्यात आल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बुजविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कंत्राटदाराने सिमेंट काँक्रीट टाकून फोडलेले रस्ते बुजविण्याचे काम सुरु केले. मात्र, या खोदकामातील माती कुठे रस्त्यावर ते कुठे रस्त्याच्या बाजुला कायम असल्याने या पावसाळ्यात प्रतापनगरातील असंख्य रस्ते चिखलमय झाले आहे. या रस्त्यांवरुन वाहने घसरत आहे. दरम्यान काही अपघातही झाले. त्यामुळे या रस्त्यांची स्वच्छता करण्याची गरज व्यक्त होत आहे.वर्धा ते आर्वी मार्गाला आले पांदण रस्त्याचे स्वरूपझडशी- ग्रामीण भागासह शहरी भागातही रस्त्यांच्या विकास कामांचा जोर कायम आहे. परंतु नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. विकास कामे करताना नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष दिले नसल्याने समस्या आणखीच वाढल्या आहे. येळाकेळी ते आंजी मार्गादरम्यान बांधकामात नियोजन शुन्यता असल्याने नागरिकांसह या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता वर्धा ते आर्वी मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. परंतु नव्याने निर्माण होत असलेल्या या मार्गाच्या कामाकरिता डांबरी रस्त्याचे खोदकाम करुन त्यामध्ये बाहेरुन आणलेला मुरुम व मातीचा भर टाकल्या जात आहे. परंतु आता पावसामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला असून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढल्या असून मोठी वाहनेही या चिखलावरुन अनियंत्रित होत असल्याची ओरड होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी राहत असून येथील चिखलाने अडचणी वाढल्या आहे. येत्या दिवसात पावसाचेही प्रमाण वाढणार असून त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.धुनिवाले मठ ते शिवाजी चौक रस्त्याचे काम करावर्धा- मागील एक वर्षांपासून धुनिवाले चौक ते शिवाजी चौक पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाकरिता निधी मंजूर झाला असूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी होत आहे. या रस्त्याच्या बांधकामाकरिता शासनाकडून ५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा अतिरहदारीचा रस्ता असून ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आरती चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर भूमिगत गटार योजना मंजूर असल्यामुळे या रस्त्याचे काम थांबल्याचे बोलले जात आहे. या मार्गावर दोन विद्यालय, पेट्रोलपंप, रुग्णालय तसेच नागपूरकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याची अवस्था लक्षात घेता भूमिगत गटार योजनेच्या कामाला गती देऊन रस्त्याचेही तत्काळ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. जेणे करुन दररोज होणाऱ्या अपघातातून व त्रासातून शहरातील विद्यार्थी तसेच नागरिकांची सूटका होईल.
पाण्याच्या डबक्यातून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:00 PM
शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देअमृत योजनेने वाढविली डोकेदुखी : शहराच्या गल्लीबोळातील रस्ते चिखलाने माखले