वर्धा : भूगावकडून वर्धेच्या दिशेने येत असलेली कार अनियंत्रित होत थेट रस्ता दुभाजकावर चढली. यात कारमधील वडिलाचा मृत्यू झाला, तर मुलगी थोडक्यात बचावली. हा अपघातवर्धा-वायगाव (नि.) मार्गावरील इंझापूर शिवारातील फार्मसी कॉलेजसमोर शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झाला.
छगन मसराम (४२) असे मृताचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक छगन मसराम यांचे भूगाव परिसरात भोजनालय आहे. ते एम. एच. ३१ सी. पी. ०२७५ क्रमांकाच्या कारने भूगावकडून वर्धेच्या दिशेने येत होते. भरधाव कार इंझापूर शिवारातील फार्मसी कॉलेजजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच कार थेट रस्ता दुभाजकावर चढली. यात छगन हे गंभीर जखमी झाले. तर छगनची मुलगी मोहिनी ही थोडक्यात बचावली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती छगन यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.